Join us

निनावी पत्रकामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 01:01 IST

संपाची हाक; संघटनांनी जबाबदारी नाकारली

मुंबई : दिवाळीत दिलेले सानुग्रह अनुदानाचे आश्वासन बेस्ट प्रशासनाने अद्याप पाळलेले नाही. प्रत्येक महिन्याचे वेतनही पंधरवड्यानंतरच हातात पडत आहे. यामुळे बेस्ट कर्मचाºयांमध्ये संताप खदखदत असून, संपाची हाक देणारी पत्रके बस आगारांमध्ये लावण्यात येत आहेत. मात्र, या निनावी पत्रकांची जबाबदारी कोणतीही संघटना घेत नसल्याने, कर्मचाºयांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमामध्ये कर्मचाºयांचे पगारही वेळेवर मिळत नाहीत. कामगार संघटनांच्या दबावानंतर बेस्ट प्रशासनाने साडेपाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मात्र, दिवाळी संपल्यानंतरही अद्याप कर्मचाºयांना सानुग्रह अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये असंतोष पसरला आहे.

या असंतोषाचे रूपांतर संपात होण्याची शक्यता वर्तविणारी पत्रके बेस्ट उपक्रमाच्या अनेक बस आगारांमध्ये लावण्यात आले आहेत. हिवाळी अधिवेशनात बेस्टला मदतीबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत बेमुदत संप सुरूच ठेवण्याचा इशारा या पत्रकातून देण्यात आला आहे. त्यानुसार, आजपासून हा संप सुरू होणार होता. बेस्ट उपक्रमात १२ कामगार संघटना आहेत. मात्र, या पत्रकाची जबाबदारी कोणत्याच संघटनांनी घेतलेली नाही.बेस्ट उपक्रमाने सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षासाठी ७२० कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. यामध्ये सानुग्रह अनुदानासाठी लेखा शीर्षक उघडण्यात आले आहे.

हिवाळी अधिवेशनात बेस्ट उपक्रमातील आर्थिक अडचणींचा विषय चर्चेत आणावा, यासाठी संप पुकारण्यात येत असल्याचे या पत्रकात म्हटले आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प विलीन करण्याची मागणी या पत्रकातून करण्यात आली आहे. मात्र, अशा संपाने बेस्ट उपक्रमाचे केवळ नुकसान होईल. संप पुकारणे बेस्टसाठी आर्थिकदृष्ट्या घातक असल्याचे मत व्यक्त करीत, या बंदला बेस्ट कामगार सेनेने विरोध केला आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाबेस्ट