चेंबूरमध्ये खासगी रुग्णालयात तोडफोड
By Admin | Updated: January 24, 2015 00:51 IST2015-01-24T00:51:35+5:302015-01-24T00:51:35+5:30
रुग्णालयाने तत्काळ उपचार न केल्यानेच रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत चेंबूरमध्ये एका खासगी रुग्णालयात रहिवाशांनी तोडफोड केली.

चेंबूरमध्ये खासगी रुग्णालयात तोडफोड
मुंबई : रुग्णालयाने तत्काळ उपचार न केल्यानेच रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत चेंबूरमध्ये एका खासगी रुग्णालयात रहिवाशांनी तोडफोड केली. यामध्ये काही डॉक्टरांना देखील मारहाण करण्यात आली असून, याबाबत चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चेंबूरच्या आंबेडकर उद्यान परिसरात श्री नर्सिंग होम हे खासगी रुग्णालय आहे. गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास १० ते १२ जण एका ३० वर्षीय रुग्णाला या ठिकाणी घेऊन आले होते. त्याची प्रकृती नाजूक असल्याने रुग्णाच्या नातेवाइकांनी त्याला तत्काळ आयसीयूमध्ये नेले. या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर अमोल पवार यांनी देखील वेळ न घालवता त्याला तपासण्यास सुरुवात केली. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वी त्या रुग्णाचा मृत्यू झाला असल्याने डॉ. पवार यांनी ही बाब त्याच्या नातेवाइकांना सांगितली. ही बाब बाहेर असलेल्या रुग्णाच्या काही मित्रांना समजताच त्यांनी तत्काळ आयसीयूमध्ये धाव घेत डॉक्टर पवार आणि काही वार्डबॉयना मारायला सुरुवात केली. तसेच येथील काही नर्सना देखील या नातेवाइकांनी मारहाण करीत रुग्णालयातील सामुग्रीची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.
याच दरम्यान एका नर्सने पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस या रुग्णालयात दाखल झाले. मात्र तोपर्यंत मृतदेह घेऊन सर्व जण पसार झाले होते. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून चेंबूर पोलिसांनी १२ ते १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच या मारहाणीचे आणि तोडफोडीचे चित्रण रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून, त्याआधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)