अबू आझमींसोबत संबंध असल्याची दहशतवाद्याची कबुली

By Admin | Updated: May 5, 2014 15:33 IST2014-05-04T23:54:10+5:302014-05-05T15:33:18+5:30

समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्याशी आपले संबंध असल्याची जबानी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य सुलतान अहमद फैझान याने दिल्याने अबू आझमी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Confession of the relationship with Abu Azmi | अबू आझमींसोबत संबंध असल्याची दहशतवाद्याची कबुली

अबू आझमींसोबत संबंध असल्याची दहशतवाद्याची कबुली

मुंबई : समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्याशी आपले संबंध असल्याची जबानी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य सुलतान अहमद फैझान याने दिल्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमी चर्चेत राहणारे अबू आझमी अडचणीत येण्याची शक्यता आहे. दोन महिन्यांपूर्वी फैझान याला दुबईत अटक करून दिल्लीत आणण्यात आले होते.
सुरक्षा यंत्रणांनी फैझानचे भारतातील काही नेत्यांशी असलेल्या संबंधांबाबत चौकशी केली असता १९८० साली स्थापन केलेल्या प्लेसमेंट एजन्सीमध्ये अबू आझमी आपला सहकारी असल्याचे फैझानने पोलिसांना सांगितले आहेे. नोकरीसाठी भारतातून दुबईमध्ये कामगार पाठवण्याचे काम या एजन्सीमार्फत केले जात होते.
फैझान मूळचा उत्तर प्रदेशमधील आझमगडचा रहिवासी असून, अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम आणि अबू आझमी हे देखील आझमगडचेच राहणारे आहेत. त्यामुळे फैझानचे अबू सालेम आणि अबू आझमी या दोघांसोबत जवळचे संबंध होते. २००८ साली दिल्लीत झालेल्या साखळी स्फोटांमागे पाकिस्तानमधील सूत्रधारांच्या संपर्कात राहणार्‍या फैझानचा हात होता. तसेच फैझान इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांना आसरा देण्याचे तसेच या संघटनेला आर्थिक पाठबळ देण्याचे काम करीत होता, असा पोलिसांचा आरोप आहे.
२००८ साली बाटला हाऊस एन्काउंटरनंतर डॉ. शहनवाझ, बाबा साजिद आणि सलमान या दहशतवाद्यांना फैझाननेच लॉण्ड्रीमध्ये कामगार म्हणून कामावर ठेवले होते. या एन्काउंटरनंतर तिघे दहशदवादी आझमगडमधील संजपूर गावातील एक घरात अनेक महिने लपून बसले होते. त्यानंतर २००९ साली ते बनावट पासपोर्टच्या साहाय्याने नेपाळमार्गे दुबईला परागंदा झाले होते. दुबईत या तिघांना फैझानने आपल्या लॉण्ड्रीमध्ये कामावर ठेवून आश्रय दिला होता. तेथेच आमीर रझा खान आणि इंडियन मुजाहिदीनचा प्रमुख इक्बाल भटकळ यांनी त्यांची भेट घेतली. त्या भेटीत इक्बालने सलमानला प्रशिक्षणासाठी पाकिस्तानमध्ये पाठवले. पुढे सलमान पुन्हा नेपाळमध्ये मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांना मदत करीत होता. २०१० साली यासीन भटकळने पुण्यातील जर्मन बेकरीत स्फोट करण्याच्या काही दिवस आधीच भारतीय सुरक्षा दलांनी सलमानला भारत-नेपाळच्या सीमेवर अटक केली होती.

 फैझानशी केवळ ओळख
फैझान आणि मी १९८५ पर्यंत आमच्या प्लेसमेंट एजन्सीमार्फत गरजूंना सौदी अरबमध्ये नोकरी मिळवून देत होतो. तेवढीच आमची ओळख. मात्र त्यानंतर फैझानने आपली स्वत:ची प्लेसमेंट सर्व्हिस सुरू केली आणि तो दुबईला गेला. त्यानंतर तो काय करतो याची आपणास काहीच कल्पना नाही, असे अबू आझमी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Web Title: Confession of the relationship with Abu Azmi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.