पुरुष संघात संघर्षचे विजेतेपद

By Admin | Updated: April 28, 2017 00:55 IST2017-04-28T00:55:01+5:302017-04-28T00:55:01+5:30

पंकज भोसलेच्या आक्रमक खेळामुळे संघर्ष क्रीडा मंडळाने साहसी कला क्रीडा मंडळाचा ३२-१२ असा धुव्वा उडवला. या विजयाच्या जोरावर

Confederations Cup title in men's team | पुरुष संघात संघर्षचे विजेतेपद

पुरुष संघात संघर्षचे विजेतेपद

मुंबई : पंकज भोसलेच्या आक्रमक खेळामुळे संघर्ष क्रीडा मंडळाने साहसी कला क्रीडा मंडळाचा ३२-१२ असा धुव्वा उडवला. या विजयाच्या जोरावर संघर्ष संघाने ओम भारत कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात विजेतेपदाला गवसणी घातली. तर महिला गटात निर्णायक सामन्यात नवशक्ती क्रीडा मंडळाने ३०-१८ अशा फरकाने अंतिम विजय मिळवला.
मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या मान्यतेने ओम भारत मंडळाच्या वतीने आयोजित कबड्डी सामने मॅटवर खेळवण्यात आले. पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात घाटकोपरच्या संघर्ष संघाने एकहाती वर्चस्व राखले. संघर्षच्या पंकज भोसलेने शानदार चढाई करत मध्यांतराला १८-३ अशी विजयी आघाडी घेतली. मध्यांतरांनतर साहसी संघाने सामन्यात परतण्याचे अपयशी प्रयत्न केले. यामुळे मध्यांतराला मिळवलेल्या आघाडीच्या जोरावर संघर्ष क्रीडा मंडळाने २० गुणांच्या फरकाने स्पर्धेतील मानाच्या चषकावर नाव कोरले.
महिला गटात नवशक्ती संघाने शिवनेरी संघाचा ३०-१८ अशा फरकाने पराभव केला. शिवनेरीच्या नवोदित खेळाडूंनी मध्यांतरापर्यंत चांगली झुंज दिली. मध्यांतराला नवशक्ती संघाकडे १६-१२ अशी आघाडी होती. नवशक्ती संघाच्या पूजा जाधव आणि बेबी जाधव या जोडीने पहिल्या मिनिटापासून आपला खेळ उंचावत संघाला अंतिम विजेतेपद मिळवून दिले. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Confederations Cup title in men's team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.