'मुंबईच्या सर्व जुन्या उड्डाण पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा'; आमदार ऋतुजा लटके यांची मागणी
By मनोहर कुंभेजकर | Updated: July 5, 2024 17:43 IST2024-07-05T17:42:39+5:302024-07-05T17:43:02+5:30
अंधेरी (पूर्व) गुंदवली मेट्रो स्थानकाच्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या अंधेरी उड्डाण पूलाखालील एका खासगी व्यवसायिक बांधकामाचा भाग काल कोसळला.

'मुंबईच्या सर्व जुन्या उड्डाण पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा'; आमदार ऋतुजा लटके यांची मागणी
मनोहर कुंभेजकर, मुंबई: अंधेरी (पूर्व) गुंदवली मेट्रो स्थानकाच्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या अंधेरी उड्डाण पूलाखालील एका खासगी व्यवसायिक बांधकामाचा भाग काल सायंकाळी साडेचारच्या सुमारास एका कारच्या टपावर कोसळला.
सदर घटनेची माहिती मिळताच अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदार संघाच्या उद्धव सेनेच्या आमदार ऋतुजा लटके यांनी मनपा अणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळी भेट दिली. यावेळी पूलाचा स्लॅब कोसळलेल्या भागाची पाहणी करून सदर घटनेची सविस्तर माहिती मुंबई मनपा अधिकाऱ्यांकडून घेतली. यावेळी वाहतूक पोलीस विभागाचे कर्मचारी अणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
सदर पूल धोकादायक असल्याचा अहवाल व्हिजेटीआयने दिला आहे.या उड्डाण पूलाची डागडुजी तात्पुरती करण्यात आली,मात्र एका बांधकाम व्यवसायिकाने सदर काम थांबवले आहे.सदर पूलाच्या कामाची निविदा काढण्यात आली असून अजून ठेकेदार नियुक्त केला नाही.या पूलाला लागून पार्किंग आणि खाजगी व्यवसायिकांचे गाळे आदी सुविधा आहे.मात्र सदर जागेचा वापर मोठ्या प्रमाणात गर्दुल्ले करत असल्याची माहिती आमदार ऋतुजा लटके यांनी दिली.
दरम्यान, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे अंधेरी फ्लाइओवरच्या पूलाचा भाग कोसळण्याच्या घटनेची माहिती आपण 'पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन' अंतर्गत आज सभागृहात मांडली तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली अशी माहिती त्यांनी लोकमतला दिली. मुंबईतील सर्व जुन्या उड्डाण पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, नवीन पूलाच्या बांधकामाची पाहणी करावी.तसेच अश्या दुर्घटना होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी आपण केल्याचे त्यांनी सांगितले.