Join us  

लॉकडाऊनमध्ये मजुरांची स्थिती विदारक; घरी गेलेले मजूर मुंबईत परतण्यास आतुर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 3:48 AM

विविध उद्योगांमध्ये काम करण्यासाठी मजूर उपलब्ध नसल्याने मालक वर्गाची व कंपनी प्रशासनाचीही तारांबळ उडत असून मजुरांना गावावरून परत येण्यासाठी काही मालक स्वत: तिकीट काढून देत आहेत

मुंबई : कोरोनाच्या प्रकोपामुळे देशात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे मजूरांचे प्रचंड हाल झाले. मोठ्या संख्येने मजुरांनी देशातील विविध भागातून आपापल्या घरी, गावी प्रयाण केले. सुरुवातीला कोणतीही वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्याने हजारो मजुरांना पायपीट करत शेकडो, हजारो किमी अंतर कापत घरी परतावे लागले. त्यामध्ये अनेक अभागी मजुरांना मृत्यू पत्करावा लागला. आता घरी परतलेल्या या मजुरांची मुंबईत परत येण्यासाठी घालमेल सुरु आहे. गावी उत्पन्नाचे साधन नसल्याने रोजगारासाठी मुंबई व महाराष्ट्रात परतण्यासाठी हे मजूर प्रयत्न करत असून काही मजूर परत येण्यास प्रारंभ झाला आहे.

विविध उद्योगांमध्ये काम करण्यासाठी मजूर उपलब्ध नसल्याने मालक वर्गाची व कंपनी प्रशासनाचीही तारांबळ उडत असून मजुरांना गावावरून परत येण्यासाठी काही मालक स्वत: तिकीट काढून देत आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने देशाच्या विविध राज्यातील लाखो मजूर मुंबई व महाराष्ट्रात कामानिमित्त वास्तव्याला आहेत. लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे व छोटेमोठे व्यवसाय पूर्णत: ठप्प झाल्याने मजुरांचे हाल होऊ लागले. वेतन बंद झाल्याने त्यांच्यासमोर जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. सरकारी जेवणात त्यांची भूक भागत नसल्याने व हाताला काम नसल्यामुळे त्यांनी घरचा रस्ता पकडण्याचा पर्याय निवडला होता. राज्यात अडकलेल्या मजुरांच्या सोयीसाठी राज्यात ५४२७ कॅम्प उभारण्यात आले तसेच अन्य मदतही पुरवण्यात आली. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील सुमारे ८२३ श्रमिक विशेष ट्रेनद्वारे १२ लाखांपेक्षा अधिक स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी पोचवण्यात आले.

टॅग्स :स्थलांतरणमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस