Join us
Daily Top 2Weekly Top 5

१,३८५ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण; ५ जूनपासून खुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 12:27 IST

काँक्रीटचे क्युरिंग २ जूनपर्यंत पूर्ण होणार आहे.

मुंबई : मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या प्रकल्पांतील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण नियोजित कालावधीत पूर्ण होत आहे. पावसाळापूर्व नियोजनानुसार खोदकाम केलेल्या एकूण १,३८५ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. काँक्रीटचे क्युरिंग २ जूनपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर ५ जूनपर्यंत पावसाची उघडीप मिळताच थर्मोप्लास्ट, कॅट आइज, दिशादर्शक फलक, वाहतूक सुरक्षा चिन्हे, जंक्शन ग्रीड अशी अखेरची कामे पूर्ण करून ते वाहतुकीस खुले करण्याची सूचना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पांतर्गत पूर्व उपनगरात पूर्ण होत असलेल्या रस्ते कामांची बांगर यांनी बुधवारी रात्री ठिकठिकाणी पाहणी केली. रस्ते काँक्रिटीकरणाचा टप्पा १ आणि टप्पा २ मिळून, एकूण १,३८५ रस्त्यांची कामे सुरू आहेत. या सर्व रस्त्यांवर पेव्हमेंट क्वालिटी काँक्रीटची (पीक्यूसी) कामे पूर्ण झाली आहेत. या रस्त्यापैकी ३० रस्त्यांचा अंशतः भाग मास्टिक अस्फाल्टद्वारे पूर्ण करण्यात येत असून, बहुतांशी रस्ते 'एण्ड टू एण्ड', तर काही रस्ते 'जंक्शन टू जंक्शन' पूर्ण झाले आहेत. उर्वरित कामे पावसाळ्यानंतर घेतली जाणार असल्याचे बांगर यांनी स्पष्ट केले.

राडारोडा हटवा

यंदा पाऊस लवकर आल्याने रस्त्यावरील राडारोडा, उर्वरित बांधकाम साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी रस्तानिहाय नियोजन करण्याच्या सूचना अतिरिक्त परिमंडळ १ रस्ते आयुक्त बांगर यांनी दिली.

येत्या दोन-तीन दिवसांत राडारोडा हटविण्याची कार्यवाही पूर्ण करावी. पावसाच्या पार्श्वभूमीवर पर्जन्य जलवाहिन्या स्वच्छ केल्या आहेत का, याची तपासणी करावी. पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये पाणी टाकून कुठे अवरोध नाही ना, याची खातरजमा करावी, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका