Join us
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटवून पर्यावरण रक्षणाची ठोस कारवाई; वर्सोव्यात दिसली प्रशासन–न्यायालय–लोकप्रतिनिधींची एकजूट

By मनोहर कुंभेजकर | Updated: February 5, 2026 19:06 IST

अतिक्रमण हटवण्यात आलेली सदर जागा आता कांदळवन संरक्षणाच्या दृष्टीने वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली असून, परिसरातील जागरूक नागरिकांनीही ही जागा सुरक्षित राहावी यासाठी सतत लक्ष ठेवले होते.

- मनोहर कुंभेजकर

मुंबई : “अतिक्रमण हटवा, पर्यावरण वाचवा” या घोषणेला प्रत्यक्षात उतरवणारी ठोस कारवाई आज वर्सोवा परिसरात पाहायला मिळाली. शासकीय जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्या लालजी मुन्ना यादव यांच्याविरोधात दाखल गुन्हा आणि अतिक्रमण निष्कासन कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र न्यायालयाने संबंधिताचा दावा तथ्यहीन ठरवत फेटाळून लावला आणि प्रशासनाच्या भूमिकेला स्पष्ट पाठिंबा दिला.

या प्रकरणात अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि न्यायालय यांच्या समन्वयातून पर्यावरण संरक्षणासाठी एक आदर्श उदाहरण निर्माण झाले आहे.

अतिक्रमण हटवण्यात आलेली सदर जागा आता कांदळवन संरक्षणाच्या दृष्टीने वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली असून, परिसरातील जागरूक नागरिकांनीही ही जागा सुरक्षित राहावी यासाठी सतत लक्ष ठेवले होते. वारंवार अतिक्रमण करण्याच्या प्रयत्नांना नागरिकांनी ठाम विरोध दर्शवला.

मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरीच्या तहसीलदार स्नेहलता स्वामी यांनी पोलीस प्रशासन, महानगरपालिका आणि अतिक्रमण निष्कासन विभागाच्या सहकार्याने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. संबंधित अतिक्रमणकर्त्यावर पर्यावरण संरक्षण कायदा तसेच अतिक्रमण प्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या कारवाईतून पर्यावरणाशी संबंधित तसेच कोणत्याही शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट आणि ठाम संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Versova: Unified action removes encroachment, protects environment; a success.

Web Summary : Versova witnessed strong action against illegal encroachment on government land. The court upheld the administration's decision, supported by local representatives. The encroached land, now under forest department control, will be used for mangrove conservation, sending a strong message against environmental violations.
टॅग्स :प्रदूषण