जयंतीच्या वर्गणीतून आदिवासी मुलांसाठी संगणक

By admin | Published: April 28, 2017 12:53 AM2017-04-28T00:53:38+5:302017-04-28T00:53:38+5:30

सध्या सर्वच थोर पुरुषांच्या जयंत्या मोठ्या थाटामाटात साजऱ्या होताना दिसत आहेत, यासाठी लाखो रुपये खर्चही होतात. मात्र,

Computer for tribal children from the distribution of Jayanti | जयंतीच्या वर्गणीतून आदिवासी मुलांसाठी संगणक

जयंतीच्या वर्गणीतून आदिवासी मुलांसाठी संगणक

Next

मुंबई : सध्या सर्वच थोर पुरुषांच्या जयंत्या मोठ्या थाटामाटात साजऱ्या होताना दिसत आहेत, यासाठी लाखो रुपये खर्चही होतात. मात्र, याला धारावीतील पालिका कर्मचारी अपवाद ठरले आहेत. कचरा उचलण्याचे काम करणारे हे पालिका कर्मचारी दरवर्षी सर्वच थोर पुरुषांच्या जयंत्या साध्या पद्धतीने साजऱ्या करू लागले आहेत. वर्गणीतून उरलेल्या पैशातून ते गरीब लोकांना मदत करत आहेत. या वेळेसदेखील या कर्मचाऱ्यांनी वर्गणी जमा करत, एका अदिवासी शाळेला संगणक भेट देत, एक आदर्श निर्माण केला आहे.
आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. अशाच धारावी परिसरात हे सर्व पालिका कर्मचारी साफसफाईचे काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये सर्वच जाती-धर्माचे लोक असल्याने, दरवर्षी एप्रिल महिन्यात या ठिकाणी सर्वच थोर पुरुषांची संयुक्त जयंती साजरी केली जाते. मात्र, या ठिकाणी साजरी होणारी जयंती ही सर्वांपेक्षा वेगळी असते. कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता, अगदी साध्या पद्धतीने या ठिकाणी ही जयंती साजरी होते. मात्र, तरीदेखील या जयंतीला सर्वच कर्मचारी आपापल्या क्षमतेनुसार वर्गणी देतात. या ठिकाणी दरवर्षी वर्गणीतून ३० ते ३५ हजार जमा होतात. यातील केवळ चार ते पाच हजार रुपयेच हे कर्मचारी जयंतीसाठी साजरे करतात. उरलेले पैसे गरीब गरजू लोकांच्या मदतीसाठी दिले जातात.
गेल्या वर्षी जमा झालेले तीस हजार रुपये या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या ‘नाम’ फाउंडेशनला दिले होते, तर या वेळेस जमा झालेल्या वर्गणीतून या कर्मचाऱ्यांनी एक संगणक विकत घेत, तो वाडा तालुक्यातील दोनघर या आदिवासी पाड्यातील एका शाळेला भेट दिला आहे. वाढत्या इंटरनेट उपयुक्ततेमुळे या मुलांनादेखील चांगले शिक्षण घेता यावे, यासाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न असल्याचे, या वेळी भरत बाड या कर्मचाऱ्यानी सांगितले. या मुलांसाठी लवकरच एक प्रोजेक्टरदेखील भेट देणार असल्याचे या कर्मचाऱ्यांतर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Computer for tribal children from the distribution of Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.