संगणक परिचालकांचा पंचायत समितींना घेराव
By Admin | Updated: November 17, 2014 23:47 IST2014-11-17T23:47:19+5:302014-11-17T23:47:19+5:30
यासंदर्भात तक्रारी करणाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात असल्यामुळे व अन्य मागण्यांसंदर्भात सोमवारी शेकडो संगणक परिचालकांनी कामबंद आंदोलन छेडत पालघर पंचायत समितीला घेराव घातला.

संगणक परिचालकांचा पंचायत समितींना घेराव
पालघर : राज्य शासनाने ग्रामपंचायतींमध्ये संग्राम कक्षाची स्थापना केल्यानंतर प्रामाणिकपणे पडेल ते काम करणाऱ्या तरुणांच्या असंघटितपणाचा, असहायतेचा फायदा घेऊन निर्धारित केलेल्या मानधनापेक्षा कमी मानधन व अपुऱ्या साहित्याचा पुरवठा केला जातो. यासंदर्भात तक्रारी करणाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात असल्यामुळे व अन्य मागण्यांसंदर्भात सोमवारी शेकडो संगणक परिचालकांनी कामबंद आंदोलन छेडत पालघर पंचायत समितीला घेराव घातला.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संग्राम कक्षाची स्थापना करून संगणक परिचालकाच्या नेमणुका करण्यात आल्या. त्यामुळे सुशिक्षित बेकार असलेल्या अनेक तरुण-तरुणींना या नोकरीत सामावून घेण्यात आले होते. त्यांना शासनाने आठ हजार मानधन देण्याचे जाहीरही केले होते. मात्र, प्रत्यक्षात पदवीधारक नसलेल्या परिचालकाला ३५०० तर पदवीधारकाला ३८०० चे मानधन हातात टेकविण्यात आले. त्यातच संगणकांची देखभाल दुरुस्ती, छपाई साहित्य कधीही वेळेवर मिळत नसल्याने अप्रत्यक्षपणे याचा भार संबंधित ग्रामपंचातीला उचलावा लागतो. यासंदर्भात तक्रारी केल्यास नोकरीतून काढून टाकण्याची धमकी देण्यात येते. वर्कआॅर्डरच्या नावाखाली वेतनकपात रद्द करावी. २०० रुपये शेअर्स म्हणून घेतलेली रक्कम सव्याज परत करावी. तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय मीटिंगचा प्रवास भत्ता मिळावा, संग्राम कक्षामधून देण्यात येणाऱ्या दाखल्यामागे प्रत्येकी १० रुपये देण्यात यावेत. महिला परिचालकांना प्रसूती व इतर रजा वाढवून मिळाव्यात. निश्चित जबाबदारीशिवाय जादा कामाचा मोबदला देण्यात यावा इ. महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी १२ नोव्हेंबरपासून संगणक परिचालकांनी कामबंद आंदोलन पुकारले असून आज पालघर पंचायत समितीला घेराव घातला. (वार्ताहर)