मंदिराची रचना, उपासना, परंपरा शक्तिपीठाच्या...

By Admin | Updated: September 16, 2014 00:36 IST2014-09-16T00:27:47+5:302014-09-16T00:36:47+5:30

‘करवीरे त्रिनेत्रं मे’: १०८, ५१ आणि साडेतीन शक्तिपीठांमध्ये या स्थानाचे माहात्म्य

The composition of the temple, worship, tradition of Shakti Pitha ... | मंदिराची रचना, उपासना, परंपरा शक्तिपीठाच्या...

मंदिराची रचना, उपासना, परंपरा शक्तिपीठाच्या...

इंदुमती गणेश -कोल्हापूर -करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ही ‘करवीरे त्रिनेत्रं मे’ म्हणजेच सतीचे पवित्र त्रिनेत्रपीठ व लक्ष्मीचे आश्रयस्थान आहे. अशा त्रिगुणात्मक चैतन्याचे अधिष्ठान असलेले स्थान म्हणून १०८, ५१ आणि साडेतीन शक्तिपीठांमध्ये या स्थानाचे माहात्म्य आहे. श्री महालक्ष्मी ही आदिशक्ती, असुरांचा संहार करणारी, महिषासुरमर्दिनी, अंबाबाई आहे. मंदिरातील धार्मिक विधी, सर्व उपासना पद्धती, इतकेच नव्हे कोल्हापूरसह मंदिराची रचना श्रीयंत्राची आहे व परिसरात शिवशक्तीच्या परिवारदेवता आहेत व धार्मिक विधी उपासना पद्धती शक्तिपीठाच्या आहेत, म्हणून हे शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते.
पती शंकराच्या अपमानाने क्रोधित होऊन यज्ञात आत्मार्पण केलेल्या सतीचे अवयव भारतासह विविध देशांत १०८ ठिकाणी पडले ती स्थाने शक्तिपीठ म्हणून पूजली जातात. ‘करवीरे त्रिनेत्रं मे देवी महिषमदिर्नी. क्रोधीशो भैरवस्तत्रव.’ सतीचे नेत्र ज्या ठिकाणी पडले, ते क्षेत्र म्हणून कोल्हापूरला विशेष महत्त्व आहे. श्री महालक्ष्मीच्या मस्तकावर असलेले नागलिंग व योनी म्हणजे शिवशक्तीचे प्रतीक. भारतात जिथे जिथे शक्तिपीठे आहेत, तिथे श्रीचक्राची उपासना होते. मूळ मंदिराच्या वरही भगवान शंकर मातृलिंगरूपात स्थापित आहेत. महाद्वारात एका बाजूला नंदी, तर दुसऱ्या बाजूला राजा दक्षाचा शिरच्छेद केल्यानंतर शंकराने त्याच्या धडावर मेंढ्याचे शीर बसविले. या मेंढ्याचीही शिळा येथे आहे; तर मंदिराचा आकार श्रीयंत्राचा आहे. देवीच्या समोर गणपती आणि गाडगे महाराज चौकात काशीविश्वेश्वर मंदिर आहे. रुद्रगयाक्षेत्र नाव असलेल्या या ठिकाणी वाराणसी क्षेत्राच्या प्रतिकृतीनुसार श्री विश्वेश्वर, भवानी, कार्तिकेय, गंगाकुंड, मणिकर्णिका कुंड ही कुंडे आहेत.
या विश्वेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन घाटी दरवाजातून आत जाऊनच महालक्ष्मीचे दर्शन घेण्याची मूळ पारंपरिक दर्शनपद्धती आहे. कोल्हापूरच्या क्षेत्रसीमेवर आठ दिशांना आठ आणि पुन्हा चार दिशांना शिवाची मंदिरे आहेत; म्हणून हे क्षेत्र शंकराचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे.
(क्रमश:)

अभ्यासकांच्या नजरेतून...
महालक्ष्मीच्या मूळ स्वरूपावर अनेक अभ्यासकांनी संशोधन केले आहे. डॉ. गो. बं. देगलूरकर, रा. चिं. ढेरे, शरद पाटील, आदी अनेक अभ्यासकांनी या देवीचे स्वरूप आपल्या ग्रंथांतून मांडले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ही देवी बहुजनांची मातृदेवता आहे.

विधी...
असुरी शक्तीचा वध करण्याचे कार्य ज्या देवतेने केले, ती देवता लक्ष्मीरूपात नव्हे तर शक्तिरूपात प्रकट झाली. त्रिगुणात्मक चैतन्य असलेल्या महालक्ष्मीने उत्पात माजविलेल्या कोल्हासूर, करवीरासह विविध युगांतील असुरांचा संहार केल्याने ती जगदंबा म्हणजेच जगत-अंबा (जगाची आई) किंवा अंबा (बाई) आहे. म्हणूनच येथे देवीचा घट बसविण्याची परंपरा आहे. देवीच्या गळ्यात असलेली कवड्यांची माळ, पंचमीचा कोहळा फोडण्याचा विधी, अष्टमीची महापूजा, विजयादशमीचा सोहळा, नायकिणीसह, लव्याजम्यानिशी निघणारा पालखी सोहळा हे सर्व विधी आदिशक्तीच्या उपासनेचे आहेत.

कोल्हापूरच्या महालक्ष्मी (अंबाबाई)चा खरा इतिहास प्रकाशात यावा व चुकीचा प्रसार वेळीच थांबावा, हा या मालिकेचा उद्देश आहे. त्यासाठी वाचक, जाणकार किंवा अभ्यासक म्हणून आपल्या प्रतिक्रियाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. या विषयावर आपण ‘लोकमत’च्या लक्ष्मीपुरी, कोंडाओळ येथील कार्यालयात आपले मत लेखी स्वरूपात पाठवा किंवा प्रत्यक्ष आणून द्या, अथवा दूरध्वनीवरून संपर्क साधा. निवडक प्रतिक्रियांना प्रसिद्धी दिली जाईल.

Web Title: The composition of the temple, worship, tradition of Shakti Pitha ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.