Join us

गोखले पूल ३० एप्रिलपासून पूर्णत: सेवेत? दुसऱ्या गर्डरचे काम मार्गी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 12:11 IST

पोहोच रस्ते, पथदिवे, रंगरंगोटी करणार

मुंबई : अंधेरी येथील गोखले उड्डाणपुलाचा दुसरा गर्डर खाली आणण्याचे काम पूर्ण झाल्याने आता पोहोच रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. रेल्वेच्या हद्दीतील कामे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित कामे वेळापत्रकानुसार करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे ३० एप्रिल २०२५ रोजी हा पूल वाहतुकीस खुला करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे नवीन वर्षात अंधेरीतील रहिवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे.

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या पहिल्या गर्डरनंतर दक्षिण बाजूचे लोखंडी गर्डर रेल्वे भागावर टप्प्याटप्प्याने आठ मीटरपर्यंत खाली आणण्यात आले आहेत. हा गर्डर १.० मीटर रुंदीच्या पदपथासह १३.५ मीटर रुंद (३ अधिक ३ मार्गिका) आणि ९० मीटर लांब आहे. हे काम तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक असल्याने या कामाला जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागला. 

दरम्यान, सुरक्षेला प्राधान्य देत एखाद्या पुलाच्या कामात मोठ्या उंचीवरून गर्डर विशिष्ट उंचीपर्यंत खाली आणण्याचा हा देशातील पहिलाच प्रकल्प ठरला आहे. रेल्वे मार्गांवर हा पूल उभारण्यात येत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने सर्वतोपरी काळजी घेतली गेल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. आता हा नियोजित उंचीवरील गर्डर खाली आणल्यानंतर क्रॅश बॅरिअर, डांबरीकरण, पोहोच रस्त्यांची कामे, पथदिवे, मार्गिकांचे रंगकाम, अशी विविध कामे पूर्ण करण्यात येणार आहेत, असे पालिकेकडून सांगण्यात आले. 

कंत्राटदाराला दंड

गर्डर बसवण्यासाठी सुटे भाग आणण्याकरिता कंत्राटदाराने उशीर केल्याने त्याला प्रशासनाने नवीन वेळापत्रक दिले होते. मात्र, ते पाळणेही त्याला जमलेले नाही. 

रेल्वेच्या हद्दीतील कामे १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण न झाल्यास तीन कोटींचा दंड आकारण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला होता. त्यानुसार हा दंड कंत्राटदाराला आकारला जाणार आहे. त्यापुढे जितके दिवस उशीर झाला तितक्या दिवसांचा त्याला दंड लावण्यात येणार आहे. 

टॅग्स :अंधेरीमुंबई महानगरपालिका