मालाड मीठ चौकी उड्डाणपूलाचे काम तातडीने पूर्ण करा! केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे पालिका अधिकाऱ्यांना निर्देश
By मनोहर कुंभेजकर | Updated: December 22, 2024 14:53 IST2024-12-22T14:52:35+5:302024-12-22T14:53:44+5:30
मीठ चौकी उड्डाणपुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी कोणत्या अडचणी येत आहेत, कोणत्या परवानग्या बाकी आहेत, याबाबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी महापालिका अधिकारी आणि वाहतूक पोलीस यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून दि,१४ जानेवारी पर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

मालाड मीठ चौकी उड्डाणपूलाचे काम तातडीने पूर्ण करा! केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे पालिका अधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई : मालाड पश्चिमेकडील लिंक रोडवरून मालवणीकडे जाणाऱ्या प्रवाशांना मीठ चौकी सिग्नलवरील वाहतूक कोंडीमुळे तासनतास वाट पाहावी लागत होती. मात्र, लवकरच मीठ चौकी उड्डाणपुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण होऊन पूलाचा शुभारंभ नवीन वर्षात होणार आहे. यामुळे नागरिकांची वाहतूक कोंडी आणि गैरसोय दूर होईल. आज केंद्रीय वाणिज्य मंत्री व उत्तर मुंबईचे स्थानिक खासदार पीयूष गोयल यांनी या प्रकल्पाची पाहणी करून कामाची प्रगती तपासली.
मीठ चौकी उड्डाणपुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी कोणत्या अडचणी येत आहेत, कोणत्या परवानग्या बाकी आहेत, याबाबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी महापालिका अधिकारी आणि वाहतूक पोलीस यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून दि,१४ जानेवारी पर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. या पूलाच्या उभारणीमुळे मालाड आणि मालवणी परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार असून मालाडवासियांची वाहतूक कोंडीपासून होणार सुटका होणार आहे.प्रवाशांना वाहतुकीसाठी सुकर आणि जलद पर्याय उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले की, उत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनवण्याचा संकल्प महायुतीने केला आहे. विधानसभा निवडणुकीत उत्तर मुंबईतून महायुतीचे पाच आमदार निवडून आल्याने विकासकामांना गती मिळाली आहे. मीठ चौकी उड्डाणपुलाच्या कामात कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी जिल्हाधिकारी, वाहतूक पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अवजड वाहनांवर सक्त कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.