चहाविक्रेत्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
By Admin | Updated: July 5, 2015 03:35 IST2015-07-05T03:35:56+5:302015-07-05T03:35:56+5:30
घाटकोपरच्या अमृतनगरात चहाविक्री करणाऱ्या रोहित पाटील या तरूणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपात पार्कसाईट पोलिसांनी तिघांना अटक केली.

चहाविक्रेत्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
मुंबई : घाटकोपरच्या अमृतनगरात चहाविक्री करणाऱ्या रोहित पाटील या तरूणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपात पार्कसाईट पोलिसांनी तिघांना अटक केली. महेंद्र साळवी, महेंद्र पवार आणि येलप्पा नेसरीकर अशी त्यांची नावे आहेत. यापैकी एक भाजप आमदार राम कदम यांचा सुरक्षा रक्षक असल्याचा दावा तक्रारदार रोहितने पोलिसांकडे केला आहे.
दोन दिवसांपुर्वी रोहितने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर राजावाडी रूग्णालयात उपचार सुरू होते. रोहित शुद्धीवर आल्यानंतर त्याने दिलेल्या जबाबानुसार पार्कसाईट पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारहाणीचा गुन्हा नोंदवून ही कारवाई केली. जबाबात या तिघांनी आदल्यादिवशी बेदम मारहाण केल्याचा आरोप रोहितने केला. तसेच चहाची टपरी, पानाच्या गादीसह घराजवळील साईमंदिरावर या तिघांचा डोळा होता. ते हडपण्यासाठी या तिघांकडून जाच होत होता. काही दिवसांपुर्वी महेंद्रने टपऱ्यांना टाळे ठोकले, असा आरोपही रोहितने केला. आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच या सर्व घटनांना साक्षीदार असलेल्यांचे जाबजबाब नोंदविण्यात येत असल्याचे पार्कसाईट पोलीस सांगतात.
आॅडिओ क्लिपचा तपास
या घटनेनंतर आमदार राम कदम यांनी मोबाईलवरून रोहित यांच्या पत्नी मिना यांच्याशी संवाद साधला. त्या संवादाची व्हायरल झालेली क्लीप पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतली आहे.