सुनील शेट्टीची टॅक्सीचालकाविरुद्ध तक्रार
By Admin | Updated: November 9, 2016 04:18 IST2016-11-09T04:18:35+5:302016-11-09T04:18:35+5:30
बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टीने आपल्या कार्यालयासमोरील काही टॅक्सीचालकांनी धमकावल्याची तक्रार वरळी पोलिसांकडे केली आहे

सुनील शेट्टीची टॅक्सीचालकाविरुद्ध तक्रार
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टीने आपल्या कार्यालयासमोरील काही टॅक्सीचालकांनी धमकावल्याची तक्रार वरळी पोलिसांकडे केली आहे. याप्रकरणी वरळी पोलीस अधिक तपास करत आहेत.
वरळी येथील आनंद निवासमध्ये सुनील शेट्टींचे कार्यालय आहे. या कार्यालयासमोर काही टॅक्सीचालक डबल पार्किंग करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे भेटीसाठी येणाऱ्या व्यक्तींनाही त्रास देतात, असा आरोप सुनील शेट्टीने केला आहे. काही टॅक्सीचालकांनी गेटसमोरच पार्किंग केले होते. अशात कारमधून आत शिरत असताना वाटेत असलेली वाहने त्यांना हटविण्यास सांगितले. त्यावेळी तेथील टॅक्सीचालकांनी उद्धटपणे उत्तरे दिली. ही मंडळी या परिसरात पत्ते खेळत बसत असल्याचेही त्यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे. या प्रसंगा दरम्यान ४०-५० टॅक्सीचालक तेथे असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
आपल्या कारला गेटमध्ये शिरकाव करण्यासाठी जागा देण्याची विनंती केली असता त्यांनी पुन्हा मुजोरी केली आणि मारहाण करण्याची धमकी दिल्याचेही शेट्टींचे म्हणणे आहे. त्यानुसार अधिक तपास सुरु असल्याची माहिती वरळी पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)