Join us

आरएसएसवर केलेल्या वक्तव्यावरून जावेद अख्तर यांच्याविरोधात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 07:38 IST

एका वकिलाने महानगर दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी सरूपाची तक्रार केली आहे

मुंबई : एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) विरोधात  आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात एका वकिलाने महानगर दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी सरूपाची तक्रार केली आहे. मुलुंडच्या दंडाधिकारी न्यायालयात जावेद अख्तर यांच्याविरोधात भारतीय दंडसंहिता कलम ४९९ (मानहानी) आणि ५०० (मानहानी केल्याबद्दल शिक्षा) अंतर्गत तक्रार करण्यात आली आहे. अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आरएसएसची तुलना तालिबानशी केली. तक्रारदार संतोष दुबे यांनी आपण आरएसएसचे समर्थक असल्याचा दावा केला आहे. राजकीय फायद्यासाठी जावेद अख्तर यांनी नाहक आरएसएसचे नाव घेतले आणि बदनाम केले. ही एक सुनियोजित योजना होती, असे दुबे यांनी तक्रारीत म्हटले आहे.आरोपीने मुलाखतीदरम्यान केलेले वक्तव्य सुनियोजित होते. आरएसएसची बदनामी करून संघात नव्याने दाखल झालेल्या व दाखल होऊ इच्छिणाऱ्यांना परावृत्त व दिशाभूल करण्यासाठी करण्यात आले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. आरएसएसची विचारधारा, तत्त्वे, विचारपद्धत, कार्यपद्धती कशी आहे, याची जाणीव आरोपीला आहे. आरएसएस आणि तालिबान यामध्ये कोणत्याही स्वरूपाचे साम्य नाही. तरीही संघाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्यासाठी आरोपीने जाणीपूर्वक व हेतूत: असे विधान केले, असे तक्रारीत म्हटले आहे.१६ नोव्हेंबर रोजी न्यायालय तक्रारदाराचा जबाब नोंदवणार आहे. दुबे यांनी याआधी मुलुंड पोलीस ठाण्यात अख्तर यांच्याविरोधात तक्रार केली. पोलिसांनी त्यांच्यावर आयपीसी कलम ५०० अंतर्गत गुन्हा नोंदविला. गेल्या महिन्यात दुबे यांनी अख्तर यांना कायदेशीर नोटीस बजावून माफी मागण्यास सांगितले होते.

टॅग्स :जावेद अख्तरराष्ट्रीय स्वयंसेवक संघ