खामदेत गावठी दारुच्या विरोधात तक्रार
By Admin | Updated: October 20, 2014 23:04 IST2014-10-20T23:04:36+5:302014-10-20T23:04:36+5:30
सावली ग्रामपंचायत हद्दीतील खामदे गावात अवैध गावठी दारुच्या धंद्यांचे प्रमाण प्रचंड वाढले असून याबाबत येथील महिला वर्गाने सामूहिक अर्जाद्वारे हे धंदे तातडीने बंद करावेत

खामदेत गावठी दारुच्या विरोधात तक्रार
नांदगाव : सावली ग्रामपंचायत हद्दीतील खामदे गावात अवैध गावठी दारुच्या धंद्यांचे प्रमाण प्रचंड वाढले असून याबाबत येथील महिला वर्गाने सामूहिक अर्जाद्वारे हे धंदे तातडीने बंद करावेत, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली होती. परंतु या तक्रारीचा राग धरुन गावठी दारुचा धंदा करणारे व्यक्तींनी तक्रारदार महिला रुक्मिणी बाळाराम खुटीकर हिला जबर मारहाण केली. याप्रकरणी एका महिला मंडळाने मारझोड करणाऱ्यांवर मुरुड पोलिसांनी कडक कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. यामुळे सावली येथील वातावरण तणावग्रस्त झाले आहे. खामदे गावात पाच व्यक्ती गावठी दारु विक्रीचा धंदा करतात. यामुळे येथील पुरुष मंडळी व तरुण मुलांना व्यसन लागण्याची कैफियत या महिलांनी मांडली आहे. मारहाण झालेली महिलांवर कल्याणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलीस तक्रार केली असता, पोलीस जुजबी कार्यवाही करत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.
सावली ग्रामपंचायत सरपंच मंदा ठाकूर म्हणाल्या की, ज्यांनी महिलेस मारहाण झाली आहे. त्यांच्यावर कडक कार्यवाही होणे आवश्यक आहे. गावात वातावरण तप्त असून पोलीस बंदोबस्त असावा, अशी मागणी केली आहे. याबाबत मुरुड पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार महाले यांनी सांगितले, महिलांचा तक्रार अर्ज प्राप्त होताच दोन पीएसआय व पोलिसांकडून या भागाची तपासणी केली. परंतु येथे कोणतीही दारु आढळून आलेली नाही. ज्या महिलेस मारहाण झाली तिची तपासणी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली असून जबर दुखापत नसल्याने संबंधितांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही केली असल्याचे सांगितले. दारु विक्रेत्यांकडून दहशत पसरविली जात असून काही दिवस तरी पोलीस बंदोबस्त असावा, अशी येथील महिलांची मागणी आहे. (वार्ताहर)