मुंबई :पश्चिम रेल्वेवरील अपघातांमधील बळींच्या वारसांना किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाइकांना प्रशासनाने जानेवारी २०१५ ते मे २०२५ या कालावधीत एकूण ११८ कोटी रुपयांची भरपाई दिली आहे. त्यात मृत्युमुखी पडलेल्या एक हजार ४०८ प्रवाशांच्या वारशांना एकूण १०३.७१ कोटी रुपये, तर ४९४ जखमींना १४.२४ कोटी रुपये भरपाई दिल्याची माहिती गॉडफ्रे पिमेंटा यांना माहिती अधिकारात रेल्वेने दिली आहे.गर्दीच्या वेळेत अनेकदा लोकलच्या डब्यांमध्ये सध्या पाय ठेवायलाही जागा नसते. अशातच सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेच्या उपाययोजना कमी पडत असल्याने अनेकांचे नाहक जीव जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या तपशीलानुसार जानेवारी २०१४ ते डिसेंबर २०२४ पर्यंत रेल्वे अपघातांत २८ हजार ९७४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्तांमधील अधिकृत प्रवाशांना रेल्वेकडून भरपाई देण्यात येते.
भरपाईचा लाभ कोणाला? रेल्वे प्रवासदरम्यान ट्रेस पासिंग, धावत्या ट्रेनमधून पडणे, ट्रेनचा फूटबोर्ड आणि फलाट यामधील गॅपमध्ये पडणे, रेल्वे पोलवर आपटणे, विद्युत धक्का, आत्महत्या, नैसर्गिक मृत्यू या कारणांमुळे प्रवाशांनी जीव गमावला आहे. अशात ज्या मृत्यूच्या घटनांमध्ये रेल्वेची जबाबदारी असते, अशा तिकीट किंवा पासधारक प्रवाशांना भरपाई देण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
१५० प्रकरणे मार्गी रेल्वेने २०१९ मध्ये दावा न्यायाधिकरण सुरू केले, त्यामार्फत पहिली लोकअदालत घेण्यात आली. त्यावेळी प.रे.च्या १०६, तर म. रे.च्या १५० प्रकरणांचा निपटारा झाला. त्यात ६.६८ कोटींची भरपाई देण्यात आली. लोकअदालतींमुळे अपघाताच्या दाव्यांवर सामंजस्याने आणि जलद निर्णय घेतले जात असल्याने विवाद सोडविण्याची ही एक प्रभावी प्रणाली ठरली आहे.