Join us  

आत्महत्येपूर्वी खासदाराने लिहिले १५ पानांचे पत्र; गळफास लावून घेतल्याचे शवविच्छेदनात उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 2:07 AM

सुसाइड नोटमध्ये गुजरातच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह काही राजकीय नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.

मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्याच केल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. तसेच आत्महत्येपूर्वी त्यांनी लेटरहेडवरच गुजराती भाषेत १५ पानांची सुसाइड नोट लिहिली. याच नोटच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.

सुसाइड नोटमध्ये गुजरातच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह काही राजकीय नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र या नावांंबाबत पोलिसांकडून अद्याप दुजोरा दिलेला नाही. सुसाइड नोटच्या आधारे अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले. तपास सुरू असल्याने त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप सांगता येणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

नेमके काय घडले?

डेलकर यांनी सुसाइड नोट कधी लिहिली? तसेच ते आत्महत्येच्या विचारांनीच मुंबईत आले होते का? त्या रात्री नेमके काय झाले? त्यांचे शेवटी कुणाशी बोलणे झाले? अशा अनेक प्रश्नांबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून त्यांनी गळफास घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत काही संशयास्पद नसून ती आत्महत्याच असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात

जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनानंतर सोमवारी रात्री डेलकर यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पुढच्या आठवड्यात कुटुंबीय मुंबईत आल्यानंतर त्यांचे जबाब नोंदवण्यात येतील. अद्याप कुणाचाही जबाब नोंदविण्यात आलेला नाही. 

टॅग्स :पोलिसमुंबई