मुंबई : नालेसफाईच्या आडून मुंबई महापालिकेचे काही अधिकारी आणि ठेकेदार यांचे भ्रष्टाचाराचे रॅकेट सुरू असल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग ऑपरेशनमधून उघड करताच महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी गंभीर दखल घेत दक्षता विभागाच्या प्रमुख अभियंत्याची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. १५ दिवसांत चौकशीचा पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यास संगितले आहे.
या घटनेनंतर हेराफेरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ‘नालेसफाई की महापालिकेच्या तिजोरीची सफाई?’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने केलेले स्टिंग ऑपरेशन बुधवारी प्रसिद्ध झाले. नालेसफाईच्या भ्रष्टाचाराची स्टिंग ऑपरेशनने पोलखोल केली. त्याचे मुंबईत तीव्र पडसाद उमटले. या बातमीने संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत. आयुक्तांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
महापालिकेने निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. पावसाळ्यापूर्वी कामांचा भाग म्हणून नदी, मोठ्या आणि लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. या कामांची माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सॉफ्टवेअरच्या सहाय्याने प्राप्त होत आहे. गाळ काढण्याच्या कामात परिणामकारकता व पारदर्शकता सुनिश्चित केली जावी, यासाठी पालिका मुख्यालयात वॉर रूम स्थापन करण्यात आली आहे. तेथे प्रत्यक्ष कार्यस्थळी असलेल्या कामावर देखरेख ठेवण्यात येते. दररोज सकाळी आठ वाजेपासून रात्री ११:०० वाजेपर्यंत दोन स्तरांमध्ये या वॉर रूममधून पालिका प्रशासनाचे गाळ काढण्याच्या कामावर लक्ष असते. त्यासाठी वॉर रूममध्ये एका अभियंत्यासह तीन जणांची टीम असते.
नियमानुसार आणि देखरेखीखाली नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे सुरू असतानाही असा प्रकार होणे योग्य नाही. त्यामुळे पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार दक्षता विभागाच्या प्रमुख अभियंत्याची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी १५ दिवसात अहवाल आयुक्तांना सादर करावा - मुंबई महापालिका प्रशासन