किल्ले संवर्धनासाठी समिती गठित
By Admin | Updated: March 25, 2015 01:53 IST2015-03-25T01:53:48+5:302015-03-25T01:53:48+5:30
राज्याच्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारने विशेष समिती गठित केली

किल्ले संवर्धनासाठी समिती गठित
मुंबई : राज्याच्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारने विशेष समिती गठित केली असून, प्रमुख मार्गदर्शक म्हणून निनाद बेडेकर व पांडुरंग बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमध्ये हृषीकेश यादव, राजेंद्र टिपरे, राजेंद्र शेळके, प्रमोद पाटील, भगवान चिले, वी.रा. पाटील, प्र.के. घाणेकर, सचिन जोशी, प्रफुल्ल माटेगावकर, संकेत कुलकर्णी आदी सदस्यांचा समावेश असेल, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री तावडे यांनी विधान परिषदेत दिली.
राज्यातील गड-किल्ल्यांची दुरवस्था, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या झालेल्या दुरवस्थेबद्दल लक्षवेधी सूचना राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांनी मांडली. राज्यातील सर्व किल्ल्यांचे योग्य प्रकारे संवर्धन व जतन करण्याबाबत त्वरित जास्तीतजास्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी चव्हाण यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली. केंद्राकडे रायगड किल्ला आम्ही मागितला आहे. गड-किल्ल्यांना भेट देणाऱ्यांची संख्या वाढावी, तसेच पर्यटकांसमोर शिवकालाचा इतिहास उभा राहावा यासाठी प्रयत्न केले जातील. दरवर्षी किल्ले रायगडावर महोत्सवाच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास उभा केला जाणार आहे. मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. ४-५ हजार कलाकारांच्या माध्यमातून शिवकाल उभा करण्याचा मानस आहे. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याचे तावडे यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)
च्महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती मंत्री तावडे यांनी दिली. राज्यातील काही किल्ले केंद्राच्या अखत्यारीत तर काही राज्याच्या अखत्यारीत आहेत.
च्यातील काही किल्ले राज्याकडे देण्यात यावेत यासाठी अधिवेशनापूर्वी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांची भेट घेतली. केंद्राच्या निकषांचे काटेकोर पालन करीत या किल्ल्यांचे संवर्धन करण्याची हमी दिल्याचे ते म्हणाले.