उद्धव यांची सरकारवर टीका
By Admin | Updated: January 6, 2015 01:31 IST2015-01-06T01:31:14+5:302015-01-06T01:31:14+5:30
दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून सरकारच्या घोषणेची किती अंमलबजावणी झाली, ते पाहणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

उद्धव यांची सरकारवर टीका
मुंबई : दुष्काळग्रस्तांना मदत करताना सरकार कमी पडत असल्याची खंत व्यक्त करीत छायाचित्र प्रदर्शन संपल्यावर आपण दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून सरकारच्या घोषणेची किती अंमलबजावणी झाली, ते पाहणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ठाकरे यांच्या ७० छायाचित्रांचे प्रदर्शन ७ ते १२ जानेवारी या कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरीत भरवण्यात आले आहे. या छायाचित्रांच्या विक्रीतून उपलब्ध होणारा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरिता देण्यात येणार असून, त्यासाठी एका
ट्रस्टची स्थापना केल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या समस्यांशी मुंबई शहरातील लोकांना जोडण्याचा आपला प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. त्यावर सरकार सध्या देत असलेल्या मदतीवर समाधानी आहात का, असा सवाल ठाकरे यांना केला असता त्यांनी वरील उत्तर दिले.
सरकारने जाहीर केलेली मदत लोकांच्या हातात पोहोचली किंवा कसे, ते प्रत्यक्ष दौरा करून पाहणार आहे. उणे २० अंश सेल्सियस तापमानात हिम अस्वलांचे फोटो काढतानाही माझ्या मनात माझ्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचाच विचार होता, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. माझा छंद फोटोग्राफी असून घराणेशाहीने जसा राजकारणाचा वारसा घेतला तसाच कलेचाही वारसा घेतला, असा टोला उद्धव यांनी कुणाचाही नामोल्लेख न करता लगावला. योग्य वेळी क्लिक करून अचूक क्षण टिपण्याची किमया फोटोग्राफीत जमली तशी राजकारणात अचूक क्षणी योग्य निर्णय घेण्याची किमया तुम्हाला जमली का, असे विचारले असता त्याचे प्रदर्शन करीन तेव्हा तुम्हाला कळेलच, असे ठाकरे
उत्तरले. (विशेष प्रतिनिधी)
काँग्रेस राजवटीत जो गोंधळ झाला तोच मागील पानावरून पुढे चालू राहणार असेल, तर चांगले दिवस नक्की कोणाच्या वाट्याला आले, हा प्रश्नच आहे. काँग्रेस राजवटीत उडालेला भडका जर लोकभावनेचा उद्रेक होता तर मग आता तोच उद्रेक कायदा-सुव्यवस्थेची होळी वगैरे ठरू नये. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी केंद्र सरकार काय करणार तेवढे सांगा म्हणजे झाले, अशी टीका ठाकरे यांनी आपल्या मुखपत्रातून केली आहे.