Join us  

मुंबईला दिलासा; ऑक्सिजनची समस्या आज दुपारपर्यंत सुटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 5:58 AM

आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचे परिस्थितीवर लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना रुग्णांना ऑक्सिजन कमी पडत असल्याने त्यांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात शनिवार गेला. त्यानंतर रविवारी मुंबई पालिकेच्या रुग्णालयात अशा काहीच अडचणी आल्या नाहीत. रविवारी पुरेसे ऑक्सिजन होते. खासगी रुग्णालयांत एखाद दुसरे प्रकरण वगळता असे काही निदर्शनास आले नाही. मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ऑक्सिजनबाबत अडचण नसल्याचे म्हटले असून, ऑक्सिजन येण्यास सुरुवात झाली आहे. पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सोमवार दुपारपर्यंत ऑक्सिजनची अडचण दूर होईल. 

ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाल्यामुळे पालिकेच्या सहा रुग्णालयांतील १६८ रुग्णांना इतर कोविड रुग्णालय व कोविड केंद्रांमध्ये शनिवारी स्थलांतरित केले. भगवती रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर कमी पडल्यानंतर शुक्रवारी २५ रुग्णांना अन्य रुग्णालयात हलविले. त्यानंतर शनिवारी आणखी सहा ठिकाणी ही समस्या निर्माण झाली होती. दरम्यान, मुंबईला ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासह सर्वजण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 

आरोग्य विभाग रात्रंदिवस कार्यरतरुग्ण व्यवस्थापन करण्यासाठी सर्व सहायक आयुक्त आणि त्यांचे सहकारी, संपूर्ण आरोग्य विभाग रात्रंदिवस कार्यरत आहेत. प्राणवायू उपलब्धतेसह कोविड बाधितांची आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात येत आहे. महापालिका प्रशासन आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.

ऑक्सिजनची चणचण नाहीऑक्सिजनची चणचण लक्षात घेता पालिकेने दररोज ५० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होईल, यासाठी एका कंपनीबरोबर करार केला आहे. परिणामी पालिकेला आता दररोज २८५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होईल आणि मुंबईत ऑक्सिजनची चणचण भासणार नाही.

रुग्णांना सुरक्षितपणे हलवलेमहानगरपालिकेच्या सहा रुग्णालयांमधील १६८ काेराेनाबाधित रुग्णांना प्राणवायू उपलब्ध असलेल्या ठिकाणी सुरक्षितपणे हलवण्यात आले. प्राणवायू पुरवठा सुरळीत राखण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. महापौर, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आयुक्तांसह संपूर्ण प्रशासनाचे सातत्याने परिस्थितीवर लक्ष होते.

३५० नवीन रुग्णवाहिका मागील आठवड्यात ३५० रुग्णवाहिका नव्याने दाखल झाल्या. प्राणवायू पुरवठा सुरळीत रहावा म्हणून ६ समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत.

रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी  रेमडेसिविरच्या २ लाख मात्रा खरेदी करण्याचे कार्यादेश दिले आहेत. त्यातील २५ हजार मात्रा प्राप्त झाले.

६ ऑक्सिजन पुरवठादारमुंबईतील प्रत्येकी ४ विभागांमागे एक याप्रमाणे एकूण २४ प्रशासकीय विभागांसाठी ६ प्राणवायू पुरवठादार नियुक्त करण्यात आले आहेत, जे तातडीच्या स्थितीत प्राणवायू उपलब्ध करुन देवू शकतील.

प्रशिक्षणाची कार्यवाहीमुंबईतील ६४ नर्सिंग होममध्ये प्राणवायूचा सुयोग्य व काटकसरीने उपयोग करण्याबाबत प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

१ हजार ५० आयसीयू बेड नव्याने उपलब्धमुंबईत एकूण १५३ कोविड रुग्णालये असून त्यामध्ये सध्या २० हजार ४०० बेड आहेत. आठवड्यात ही संख्या २२ हजार होईल. १० फेब्रुवारीपासून आजमितीपर्यंत १,०५० आयसीयू बेड नव्याने उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस