Join us

पालिकेचे कंत्राट मिळण्यासाठी ठेकेदारांचे संगनमत; ११ जणांना नोटिसा, दोषींवर होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 09:28 IST

पावसाळ्यात अनेक सखल भागांमध्ये पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. अशा भागांमधील पाण्याचा निचरा व्हावा यासाठी पालिकेतर्फे पर्जन्य जलवाहिन्यांची दुरुस्ती तसेच त्यांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई - पश्चिम उपनगरातील पर्जन्य जलवाहिन्यांची डागडुजी आणि पुनर्बांधणी कामांसाठी मागवलेल्या निविदा प्रक्रियेत कंत्राटदारांनी संगनमत केल्याची शंका आल्याने या निविदेत पात्र ठरलेल्या पाच कंत्राटदारांसह प्रक्रियेत सहभागी झालेल्या तथा बाद झालेल्या सहा कंत्राटदारांना महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये प्रस्थापित मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.

पावसाळ्यात अनेक सखल भागांमध्ये पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. अशा भागांमधील पाण्याचा निचरा व्हावा यासाठी पालिकेतर्फे पर्जन्य जलवाहिन्यांची दुरुस्ती तसेच त्यांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पालिकेने निविदा मागवल्या होत्या. यामध्ये शहरी भागात दोन, पूर्व उपनगरांत ११ आणि पश्चिम उपनगरांत पाच अशा एकूण १८ कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यातील पश्चिम उपनगरांमधील कामांसाठी अंदाजित ८० कोटी रुपयांच्या निविदा होत्या. या निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या कंत्राटदारांपैकी काही कंत्राटदार हे केवळ एका कामातच कागदपत्रांची पूर्तता न केल्याने अपात्र होते. 

त्यावर या निविदेत कंत्राटदारांचे संगनमत झाल्याची शंका व्यक्त करत अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी या संपूर्ण निविदेत सहभागी झालेल्या कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश पर्जन्य जलवाहिनी विभागाला दिले. त्यानुसार एकूण ११ कंत्राटदारांना नोटीस बजावण्यात आली. असे प्रकार यापूर्वी अनेक निविदांमध्ये झाला आहे. परंतु या ठिकाणी शंका आल्याने कंत्राटदारांनी खरोखरच संगनमत केले का, याची खातरजमा करण्यासाठी कारणे दाखवा नोटिसा पाठवल्या आहेत. पालिकेने प. उपनगरातील पर्जन्य जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी फेरनिविदा मागवण्याचा निर्णय घेतला आहे. निविदेत सहभागी  सर्व कंत्राटदारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आल्याचे समजते. 

पालिका कामाच्या या निविदांसाठी काही कंत्राटदारांनी कमी दर दाखवून निविदा भरल्या होत्या. अशा प्रकारे कमी दराची निविदा भरून दुसऱ्या कंत्राटदाराला संधी उपलब्ध करून दिली गेली. असे करणे म्हणजे एक प्रकारे संगनमत आहे म्हणून त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. - पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका