कॉलेजिअन्सने अनुभवली पावसाची रिमझिम
By Admin | Updated: June 20, 2016 02:52 IST2016-06-20T02:52:17+5:302016-06-20T02:52:17+5:30
पाऊस कधी पडणार, असा प्रश्न चातकासाप्रमाणे कॉलेजिअन्सना अधिक पडलेला असतो. कारण पावसाळा सुरू झाला की पिकनिकचे एक सो एक प्लॅन आखण्यात सगळेच बिझी होतात.

कॉलेजिअन्सने अनुभवली पावसाची रिमझिम
रामेश्वर जगदाळे, मुंबई
पाऊस कधी पडणार, असा प्रश्न चातकासाप्रमाणे कॉलेजिअन्सना अधिक पडलेला असतो. कारण पावसाळा सुरू झाला की पिकनिकचे एक सो एक प्लॅन आखण्यात सगळेच बिझी होतात.
रविवारी पावसाच्या सरीने मुंबईकरांना तृप्त केले. पण पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या कॉलेजिअन्सनी पिकनिकचे प्लॅन आखायला सुरुवात देखील केली आहे. वेगवेगळे स्पॉट शोधण्यासाठी नेट सर्फिग सुरू झाले असून, अनेकांनी पिकनिकसाठीच्या बॅगा पॅक केल्या आहेत. वाफाळलेला गरम चहा, कांदाभजी आणि बाईकवरचा गेट सेट गो असा फुल टू प्लॅन सगळ््यांनी आखला असून, तरुणाई सज्ज झाली आहे. त्याविषयी जाणून घेतले आहे.
लाँग ड्राइव्ह पे चल...
बाईकवरून फिरायला मला खूप आवडते. त्यात पावसाचा आनंद घेत बाईकवरून हिंडायला तर त्याहून जास्त आवडते. उन्हाळ््यात कोठेही फिरण्याची इच्छा होत नव्हती. पण आता पाऊस पडला आहे, तर लाँग ड्राईव्ह पे चल असा मूड झाला आहे. त्यासाठीचे भन्नाट प्लॅन आखणे सुरूच आहे.
- प्रियंका सपकाळ, कीर्ती महाविद्यालय
फुटबॉलची मजा
फुटबॉल म्हणजे जीव की प्राण. पावसात फुटबॉल खेळण्याचा आनंद काही औरच. आता सगळ््यात आधी मैदानात चिखल तुडवत फुटबॉल खेळणार आहे. आम्ही मित्रांनी त्याचे प्लॅनसुद्धा बनवले आहेत. आणि हो खेळानंतर गरम गरम टपरीवरचा चहासुद्धा अनुभवणार आहोत. पावसाळ््यातील प्रत्येक सुटीसाठीचा हा आमचा ठरलेला प्लॅन आहे.
- यश पाटील, रुपारेल महाविद्यालय
नाक्यावरची खमंग भजी
शाळेत असताना आईच्या नकळत अनेकदा भिजण्याचे प्रयत्न केले आहेत. आता मोठे झालो तरी पावसाचा आनंद अगदी तसाच. पाऊस आणि नाक्यावरची खमंग कांदाभजी हे जे काही कॉम्बिनेशन आहे, ते याच दिवसांत अनुभवायला मिळते. त्यामुळे सगळ््यात आधी नाक्यावरील गरमागरम भजी आणि चहाचा बेत आखला आहे.
- समिरा सावंत, महर्षी दयानंद महाविद्यालय
मातीचा सुंगध आणि गारवा
पावसाचा थेंब मातीवर पडतो, तो सुगंध मला खूप आवडतो. वातावरणातील तो बदल टिपण्यासाठी मी आतूर असतो. आता वातावरण इतके प्रसन्न झाले आहे की, आमचे एक सो एक प्लॅन ठरणार, समुद्राच्या लाटांचा आनंद घेण्यासाठी नरिमन पॉइंट, वरळी सीफेस या ठिकाणी जाणार, हे नक्की.
- हृषिकेश फाफळे, जयहिंद महाविद्यालय