Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील महाविद्यालये लवकरच हाेणार सुरू, लवकरच परिपत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 15:43 IST

Mumbai News : राज्यातील शाळांनंतर आता महाविद्यालयेही सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत.

मुंबई : राज्यातील शाळांनंतर आता महाविद्यालयेही सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरुवातीला ५० टक्के उपस्थितीत सुरू होतील. मात्र महाविद्यालये सुरू करण्याचा अधिकार हा सर्वस्वी संबंधित विद्यापीठ प्रशासनांचा असेल. मुंबईतील शाळा व शैक्षणिक संस्था अद्याप सुरू करण्याच्या हालचाली मनपा प्रशासनाकडून दिसत नसल्या तरी मुंबई विद्यापीठ प्रशासन  महाविद्यालये सुरू करण्याबाबत सकारात्मक असून याबाबत लवकरच परिपत्रक जारी केले जाईल, असे समजतेे.प्रत्येक विद्यापीठाने सध्या महाविद्यालयातील ७५ टक्के उपस्थितीची अट रद्द करून केवळ ५० टक्के उपस्थितीने महाविद्यालये सुरू करावीत आणि ५ मार्चनंतर ती १०० टक्के सुरू करावीत, असे यासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच या मार्गदर्शक सूचनांनुसार, महाविद्यालये सुरू करण्याआधी प्राचार्य, प्राध्यापकांच्या कोविड १९ चाचण्या, महाविद्यालयातील सुरक्षाविषयक साहित्य आणि परिस्थितीचे नियोजन याबाबतीतील मार्गदर्शन याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.दरम्यान, महाविद्यालये सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाशी विचारविनिमय करून व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि शासन निर्णयाच्या अनुषंगाने याबाबत लवकरच विद्यापीठामार्फत परिपत्रक निर्गमित करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाने दिली. ‘उपस्थिती आणि वेळेची समस्या सोडवा’मुंबईतील महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन सकारात्मक असले तरी मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक अशी रेल्वेसेवा अद्याप सुरळीत नाही. विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन वेळेत रेल्वेने प्रवासाची मुभा असेल का, असा प्रश्नच आहे. ती न मिळाल्यास महाविद्यालयांना आपल्या वेळेत बदल करावा लागणार आहे. त्यामुळे महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची एकूण उपस्थिती आणि वेळेची समस्या सोडविण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. 

टॅग्स :महाविद्यालय