एआयसीटीईकडून महाविद्यालयांना मान्यता
By Admin | Updated: May 17, 2015 01:52 IST2015-05-17T01:52:07+5:302015-05-17T01:52:07+5:30
भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) राज्यातील इंजिनीअरिंग, फार्मसी, मॅनेजमेंट, आर्किटेक्ट या अभ्यासक्रमांच्या सुमारे १५ महाविद्यालयांना मान्यता दिली आहे.

एआयसीटीईकडून महाविद्यालयांना मान्यता
मुंबई : भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) राज्यातील इंजिनीअरिंग, फार्मसी, मॅनेजमेंट, आर्किटेक्ट या अभ्यासक्रमांच्या सुमारे १५ महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. एआयसीटीईच्या प्रस्तावाला राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मंजुरी दिल्याने २0१५-१६ या शैक्षणिक वर्षात राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सुमारे दीड हजार जागा वाढणार आहेत.
इंजिनीअरिंग, फार्मसी, मॅनेजमेंट, आर्किटेक्ट, एम.सी.ए. या पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन संस्थांना एआयसीटीईने नवीन महाविद्यालये आणि तुकड्यांना मान्यता दिली आहे. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अध्यादेश काढून या महाविद्यालयांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांना मंजुरी दिली आहे. यात फार्माच्या ३०० आणि अर्किटेक्ट अभ्यासक्रमाच्या ३६0 जागा वाढणार आहेत. विविध अभ्यासक्रमांच्या तुकड्यांना मंजुरी मिळाल्याने नवीन तुकड्यांमुळे जागांमध्ये ४२८ जागांची भर पडणार आहे. नवीन महाविद्यालये आणि तुकडीवाढीमुळे २0१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या १ हजार ४४८ जागा वाढणार आहेत.
यामध्ये चंद्रपूरमधील सर्वाधिक ५ महाविद्यालयांना मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर बीडमधील ३ आणि लातूरमधील २ नवीन महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच नागपूर, सातारा, रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग येथील प्रत्येकी १ महाविद्यालय सुरू होणार आहे.
नागपूर आणि नांदेड येथील अनुक्रमे ४ महाविद्यालयांच्या अतिरिक्त तुकड्यांना मंजुरी मिळाली आहे. सांगली ३, पुणे येथील २ महाविद्यालयांच्या तुकड्यांना मंजुरी मिळाली आहे. या तुकड्या आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे.