कचऱ्यावर प्रक्रिया न करणाऱ्या सोसायट्यांकडून दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:11 IST2021-09-02T04:11:29+5:302021-09-02T04:11:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ओला व सुका कचऱ्यावर प्रक्रिया करणे मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, ...

कचऱ्यावर प्रक्रिया न करणाऱ्या सोसायट्यांकडून दंड वसूल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ओला व सुका कचऱ्यावर प्रक्रिया करणे मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अशा तीन हजार ३६७ सोसायट्यांपैकी आतापर्यंत केवळ एक हजार ६९६ सोसायट्या आपल्या आवारात कचऱ्यावर प्रक्रिया करीत आहेत. त्यामुळे या नियमांचे पालन न करणाऱ्या एक हजार ३२५ सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई करून ४५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
मुंबईतील २० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या तसेच दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या व हॉटेल यांनी त्यांच्या स्तरावर कचऱ्याचे वर्गीकरण करावे. तसेच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोसायटीच्या आवारात प्रकल्प उभारण्यासाठी पालिकेने वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही काही सोसायट्या त्याकडे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे गेली तीन ते चार वर्षे सूचना करूनही अद्यापही एक हजार ६७१ सोसायट्यांनी प्रकल्प उभारलेला नाही.
गेल्यावर्षी कोविड काळात अनेक गृहनिर्माण सोसायट्यांनी नियमांचे उल्लंघन करीत आपल्या आवारातील कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद केला. याची गंभीर दखल घेत पालिकेने अशा सोसायट्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली, तर प्रकल्प न उभारणाऱ्या सोसायट्यांवर महापालिकेने कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. नियमानुसार त्यांच्यावर खटलाही भरण्यात येणार आहे. अशा सोसायटीकडून जानेवारी २०१८ पासून आतापर्यंत ४५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
असाही एक पर्याय....
कचरा वर्गीकरण व विल्हेवाट प्रकल्प उभारण्यास इच्छुक काही सोसायट्यांना जागेअभावी कार्यवाही करणे शक्य होत नाही. अशावेळी पालिकेच्या अखत्यारीतील कचरा विलगीकरण केंद्रांच्या जागेत किंवा संबंधित संस्थांद्वारे एकत्रित पद्धतीने, त्यांच्या खर्चाने प्रकल्प उभारण्याचा पर्याय उपलब्ध आहे.