Join us
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरेकडून आले गार वारे अन् भरले कापरे! तापमानात घसरण, मुंबईकरांना माथेरानचा फील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 12:59 IST

ग्रामीण भागातही भरतेय कुडकुडी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईकरांची नवीन वर्षाची पहाटच हिवाळ्याने नाही, तर पावसाळ्याने झाली. या पावसाने हवेत गारवा आला आणि किमान तापमानात घसरण झाली. जानेवारी महिनाही बऱ्यापैकी गारठ्याचा असणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. मुंबईकरांना आणखी महिनाभर तरी थंडीचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे.

हिवाळ्यात मुंबई थंड राहण्यासाठी निसर्गाने भौगोलिक रचनेतून व्यवस्था ठेवली आहे. जेव्हा नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत उत्तरेकडून शीत लहरी वाहतात; तेव्हा काश्मीर, पंजाब, राजस्थानची थंडी पूर्व गुजरात व पश्चिम मध्य प्रदेशच्या शॉर्टकटमार्गे मुंबईत पोहोचते.

हिमालय, उत्तर भारताकडून महाराष्ट्राकडे वाहतात शीत वारे

१४ नोव्हेंबर रोजी मुंबईचे किमान तापमान १८.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर, माथेरानचेही १८ नोंदविण्यात आले होते. हिमालयासोबतच उत्तर भारताकडून महाराष्ट्राकडे वाहणाऱ्या शीत वाऱ्यामुळे राज्य गारठले होते.

मुंबईचे कमाल आणि किमान तापमान चढे नोंदविल्याने दिवाळी थंडीविनाच साजरी झाली. कमाल तापमान ३५.९ तर किमान तापमान २५.१ अंश सेल्सिअस नोंदविले होते. थंडीसाठी कमाल तापमान ३२ खाली तर किमान २० पेक्षा खाली असणे अपेक्षित असते. ऑक्टोबरपासूनच मुंबईकरांना चटके बसण्यास सुरुवात झाली होती.

३२ वर्षांनी नववर्षप्रारंभी पावसाची हजेरी...

१२ जानेवारी १९९४ साली मुंबईत १७.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर ३२ वर्षांनी म्हणजे १ जानेवारी २०२६ रोजी मुंबईत भल्या पहाटे पावसाने हजेरी लावली. १९५१ सालच्या जानेवारी महिन्यात पावसाने सांताक्रूझ वेधशाळेत ७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.

उत्तरेतील थंडी महाराष्ट्र ओलांडून तेलंगणा, कर्नाटकपर्यंत पोहोचली होती. नाताळदरम्यानच्या काळात महाराष्ट्रात थंडी होती. मुंबईसह कोकणात कमाल २८ ते ३० तर किमान १६ ते १८ डिग्री होते.

११ डिसेंबर रोजी मुंबईचे किमान तापमान १५ तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविले होते. दोन दिवसांपासून मुंबईत सातत्याने किमान तापमान खाली उतरल्याने मुंबईकरांना माथेरानचा फील येत होता.

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे काही दिवस कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार नोंदविण्यात आल्यानंतर डिसेंबर महिन्यात किमान तापमानात बऱ्यापैकी घसरण होती.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Cold Winds Bring Chill, Mumbai Feels Like Matheran!

Web Summary : Mumbai experiences a cold snap with falling temperatures, reminiscent of Matheran. January promises more cold weather. A rare January rainfall occurred after 32 years, adding to the chill as cold winds from the north sweep across Maharashtra, impacting temperatures.
टॅग्स :हिवाळा