कोलाडच्या विस्थापित 21 कुटुंबांचे उपोषण सुरू
By Admin | Updated: September 18, 2014 23:15 IST2014-09-18T23:15:45+5:302014-09-18T23:15:45+5:30
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात विस्थापित झालेल्या संजय गांधी नगर कोलाड येथील 21 घरांची नुकसान भरपाई व पुनर्वसनाची मागणी करत अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.

कोलाडच्या विस्थापित 21 कुटुंबांचे उपोषण सुरू
रोहा : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात विस्थापित झालेल्या संजय गांधी नगर कोलाड येथील 21 घरांची नुकसान भरपाई व पुनर्वसनाची मागणी करत अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. एकीकडे सर्वपक्षीय नेते विधानसभा निवडणुकीत गुंतले आहेत, तर दुसरीकडे सामान्य जनतेला न्यायासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागत असल्याने खेद व्यक्त होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर संजय गांधी नगर कोलाड ही लोकवस्ती गेली 45 वर्षे वास्तवात आहे. या वस्तीत शासनाच्या समाज मंदिर, रस्ते, शौचालय अशा विविध योजना राबविल्या गेल्या, मात्र या ठिकाणी गरिबांनी उभारलेल्या झोपडीची नोंद ग्रामपंचायत दप्तरी करण्यात आली नाही. यात राजकारण केले गेले. आज या 21 कुटुंबीयांची घरे महामार्गात गेली, मात्र त्यांना कुठलीही मदत अथवा नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. गेले सहा महिने रोहा तहसील, जिल्हाधिकारी अलिबाग येथे खेटे मारून दखल घेतली गेली नाही, उलट अपमानास्पद वागणूक दिल्याने अखेर बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले. आमचे पुनर्वसन करा, नुसते आश्वासन नको तर लेखी आश्वासन द्या या भूमिकेवर उपोषणकर्ते ठाम राहिले आहेत. दगडू हाटकर, राजेश मासूक, लिंगाप्पा बनसोडे, प्रकाश चव्हाण, अनिल क्षीरसागर, भीमाबाई येवले, दर्शना दत्ता मासूक, स्मिता सुनील सोनावले हे विस्थापित उपोषणास बसले आहेत. यावेळी आंबेवी ग्रामपंचायत सदस्य संजू कुर्ले, शिवसेना विभागप्रमुख गणोश शिंदे, आबा शिंदे यांनी उपोषणकत्र्याची भेट घेतली. या 21 कुटुंबांचा प्रश्न कसा सुटेल याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)