Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोचिंग क्लास संचालक आंदोलनाच्या पवित्र्यात; आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी २८ला बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 06:53 IST

क्लासचालक संघटनांनी याविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

मुंबई : कोचिंग क्लासेससंदर्भात केंद्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियमावलीविरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी क्लासचालक संघटनांची बैठक २८ जानेवारीला पुण्यात होणार आहे. ही नियमावली केवळ कोचिंग क्लासेससाठीच नाही, तर विद्यार्थ्यांसाठीही शैक्षणिकदृष्ट्या धोकादायक आहे, असे क्लासचालकांचे म्हणणे आहे.

क्लासचालक संघटनांनी याविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पुणे येथे २८ जानेवारीला आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व क्लासचालक संघटनांच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केल्याचे ‘महाराष्ट्र क्लास ओनर्स  असोसिएशन’चे (एमसीओए) अध्यक्ष प्रजेश ट्रोट्स्की यांनी सांगितले. अनेक आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी क्लासेस सहाय्य करतात. 

क्लासेसवरील निर्बंधांमुळे अशा विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती खुंटण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया ट्रोट्स्की यांनी दिली. कोचिंग क्लासेस बंद झाले तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होणार आहेच, शिवाय कोचिंग क्लासेसमध्ये काम करणाऱ्या लाखो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आर्थिक घडीही विस्कटणार आहे. त्यामुळे नियमावलीच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा आणि आंदोलन उभे करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

आक्षेप कशावर?कोचिंग क्लासेसमुळे वाढणाऱ्या आत्महत्या आणि काही ठिकाणी घडलेल्या आगीच्या घटना लक्षात घेऊन केंद्र शासनाने कोचिंग क्लासेसबाबत नियमावली प्रसिद्ध केली आहे. या नियमावलीनुसार १६ वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासमध्ये नोंदणी करता येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :केंद्र सरकार