सहकार व लोकशाहीत जबरदस्त चुरस
By Admin | Updated: May 3, 2015 23:13 IST2015-05-03T23:13:53+5:302015-05-03T23:13:53+5:30
वार्षिक सात हजार कोटींची उलाढाल असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेनेसह

सहकार व लोकशाहीत जबरदस्त चुरस
जितेंद्र कालेकर, ठाणे
वार्षिक सात हजार कोटींची उलाढाल असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेनेसह बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. २१ पैकी १० जागांवर आधीच बिनविरोध निवड झाल्यामुळे उर्वरित ११ जागांसाठी ‘सहकार’ आणि ‘लोकशाही सहकार’ या दोन पॅनलचे २२ आणि इतर आठ अशा ३० उमेदवारांमध्ये ही लढत होणार आहे.
येत्या ५ मे रोजी होणाऱ्या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने एरव्ही एकमेकांच्या विरोधात लढणारे पक्ष या वेळी मात्र एकमेकांच्या बरोबर आहेत. राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना आणि काँग्रेस पुरस्कृत ‘सहकार पॅनल’मध्ये बहुतांश विद्यमान संचालकांचा समावेश आहे. तर, बँकेचे माजी अध्यक्ष शिवाजी शिंदे आणि ‘बहुजन विकास आघाडी’ मिळून ‘लोकशाही सहकार’ पॅनलची निर्मिती झाली आहे. ‘सहकार’चे बाबाजी पाटील, देविदास पाटील, आमदार कृष्णा घोडा, राजेश सावळाराम पाटील, दिलीप पटेकर आदी आठ तर लोकशाही सहकारचे निलेश भोईर यांच्यासह दोघे असे १० संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.
आता खरेदीविक्री, हाऊसिंग, गृहनिर्माण संस्था, मजूर, कामगार, औद्योगिक, ग्राहक संस्था या मतदारसंघांतून ‘सहकार’चे सीताराम राणे (भाजपा) रिंगणात असून त्यांना ‘लोकशाही सहकार’ पॅनलच्या शिवाजी शिंदेंशी लढत द्यावी लागणार आहे. गेल्या निवडणुकीतही राणेंनी शिंदेंना चांगलाच घाम फोडला होता. पतसंस्था, मच्छीमार, जंगल कामगार, दुग्धसंस्था यामधून ‘सहकार’चे भाऊ कुऱ्हाडे यांच्याविरोधात ‘लोकशाही सहकार’चे सावकार गुंजाळ आणि सहकार भारतीचे शिवाजी पाटील अशी तिरंगी लढत आहे. इतर मागासवर्गीय राखीवसाठी ‘सहकार’मधून माजी संचालक आर.सी. पाटील यांचे पुत्र अरुण पाटील (भाजपा), ‘लोकशाही सहकार’चे अनिल मुंबईकर यांच्यात सामना रंगणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधून ‘सहकार’चे विद्यमान प्रभारी अध्यक्ष देविदास पाटील, ‘लोकशाही सहकार’चे राजेश रघुनाथ घोलप (बहुजन विकास आघाडी) आणि राष्ट्रवादीचे बंडखोर संजय सुरुळके यांच्यात लढत होणार आहे.