Join us  

“आधी शिवबंधन, मगच राज्यसभेची उमेदवारी”; CM उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना स्पष्टच सांगितले

By यदू जोशी | Published: May 21, 2022 5:35 AM

समर्थकांशी चर्चा करून त्यांनी निर्णय कळवावा. दोन दिवस वाट पाहू, अशी मुभा उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती आहे.

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - ‘आधी शिवसेनेत या अन् मगच राज्यसभेची उमेदवारी आपल्याला देण्याचा विचार निश्चितपणे करू,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे छत्रपती यांना सांगितले आहे. स्वत: ठाकरे यांनीच शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीत ही माहिती दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

वर्षा निवासस्थानी पाऊण तास झालेल्या शिवसेना समर्थित आमदारांच्या बैठकीत ठाकरे यांनी महाविकास आघाडी राज्यसभेची सहावी जागा निश्चितपणे लढवेल असे सांगितले. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचा एका जागेवर विजय नक्की आहे. मात्र शिवसेनेने दुसरी जागा लढविल्यास राष्ट्रवादी व काँग्रेसचा आपल्याला पाठिंबा राहील, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.

संभाजीराजे काल आपल्याला भेटायला आले होते. महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा अशी विनंती त्यांनी केली. आधी शिवबंधन बांधा, असे आपण त्यांना सांगितले. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून लढण्याची तयारी त्यांनी दर्शविली. पण ते मान्य नसल्याचे शिवसेना सहयोगी आमदारांच्या आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले.

या बैठकीला राज्यमंत्री बच्चू कडू, राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, आशिष जयस्वाल, नरेंद्र भोंडे, किशोर जोरगेवार, विनोद अग्रवाल, मंजुळा गावित आणि गीता जैन हे आमदार उपस्थित होते. संभाजीराजे किंवा बाहेरच्या उमेदवाराला संधी देण्यापेक्षा शिवसेनेतीलच नेत्याला संधी द्या, असे साकडे बहुतेक आमदारांनी ठाकरे यांना घातले. आपण घ्याल त्या निर्णयासोबत राहू, अशी ग्वाही या आमदारांनी ठाकरे यांना दिली. निधीवाटपासंदर्भात अन्याय होणार नाही याची काळजी मी स्वत: घेणार आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

आतापर्यंत काय घडल्या घडामोडी?

- शिवसेनेत या, उमेदवारी देऊ असा प्रस्ताव मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला, पण संभाजीराजे छत्रपती यांनी तो मान्य केला नाही. समर्थकांशी चर्चा करून त्यांनी निर्णय कळवावा, दोन दिवस वाट पाहू अशी मुभा ठाकरे यांनी त्यांना दिल्याची माहिती आहे.

- संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रवादीने अद्याप स्पष्टपणे पाठिंबा दिलेला नाही. आधी तसे सूतोवाच करणाऱ्या राष्ट्रवादीला गेल्यावेळी शिवसेनेने अतिरिक्त मते दिल्यानेच दोन राज्यसभा जागा जिंकता आल्या होत्या.

- यावेळी त्याची परतफेड राष्ट्रवादीला करावी लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी त्यांच्याकडील अतिरिक्त मतांबाबत संभाजीराजेंना शब्द देऊ शकत नाही ही अडचण आहे. भाजपनेही संभाजीराजे यांना पाठिंबा दिलेला नाही.

संजय राऊत २६ मे रोजी उमेदवारी अर्ज भरणार

शिवसेनेतर्फे संजय राऊत यांना पुन्हा एकदा राज्यसभेची संधी दिली जाणार आहे. तीनवेळा राज्यसभा सदस्य असलेले राऊत यांना चवथ्यांदा संधी दिली जात आहे. २६ मे रोजी ते उमेदवारी अर्ज भरतील अशी शक्यता आहे.

टॅग्स :महाविकास आघाडीसंभाजी राजे छत्रपतीउद्धव ठाकरेशिवसेना