Join us  

मुख्यमंत्री, अजय देवगण उद्या सोबत पाहणार तान्हाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 10:29 PM

प्लाझा चित्रपटगृहात विशेष शोचं आयोजन

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अभिनेता अजय देवगण उद्या सोबत तान्हाजी चित्रपट पाहणार आहेत. प्लाझा चित्रपटगृहात संध्याकाळी 6 वाजता मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवकांसाठी तान्हाजीचा स्पेशल शो दाखवला जाणार आहे. या चित्रपटात अजय देवगणनं तान्हाजी यांची भूमिका साकारली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी होत आहे. 10 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या तान्हाजी चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवलं आहे. 10 दिवसांत या चित्रपटानं 160 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत सैफ अली खान, काजोल, शरद केळकर, अजिंक्य देव यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. कोंढाणा किल्ला सर करताना तान्हाजी मालुसरे यांनी दिलेलं बलिदान यावर चित्रपटाचं कथानक आधारित आहे. तान्हाजी मालुसरेंनी स्वराजासाठी पत्करलेल्या हौतात्म्याची महिती सांगणारा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्यात यावा, अशी मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल एकमत झाल्याची माहिती 5 दिवसांपूर्वी ट्विट करुन दिली होती. करमणूक करही आता जीएसटीच्या अखत्यारित येत असल्यानं राज्य सरकार एसजीएसटीचा परतावा देणार आहे. मुख्यमंत्री लवकरच तशी घोषणा करतील, असंदेखील थोरात यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. मात्र अद्याप मुख्यमंत्र्यांनी याबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही. 

टॅग्स :उद्धव ठाकरेतानाजीअजय देवगणकाजोलशरद केळकर