Join us  

'मुख्यमंत्र्यांनी एका ठिकाणी बसूनच परिस्थितीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 3:24 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमी खासदार शरद पवार हे राज्यातील विविध जिल्ह्यांचे दौरे करत आहेत.

ठळक मुद्दे कोरोनाच्या पार्श्वभूमी खासदार शरद पवार हे राज्यातील विविध जिल्ह्यांचे दौरे करत आहेत.

मुंबई - राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून रुग्णांची संख्याही वाढत आहे. अनेक जिल्ह्यात पुनश्च लॉकडाऊन पुकारण्यात आला असून नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. राज्यातील कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसूनच काम करतात, ते बाहेर पडत नाही, असा आरोप अनेकदा विरोधकांकडून त्यांच्यावर झाला. आता, या आरोपाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उत्तर दिलंय. मुख्यमंत्र्यांनी एकाच ठिकाणी बसून काम पाहिलं पाहिजे, असे पवार यांनी म्हटलं आहे.  

कोरोनाच्या पार्श्वभूमी खासदार शरद पवार हे राज्यातील विविध जिल्ह्यांचे दौरे करत आहेत. काही दिवसांपूर्वीच ते सोलापूर दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर, आज औरंगाबाद येथील कोरोना परिस्थिचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाहेर फिरत नाही, यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, कोरोनाचे संकट राज्यात सर्वत्र पसरल्याने मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाण्यात अर्थ नाही. त्यांनी एकाच ठिकाणी बसून सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवणे अधिक गरजेचे आहे, असे पवार यांनी म्हटले. 

यासंदर्भात बोलताना, लातूरच्या भूकंपावेळी ती समस्या राज्यातील केवळ एका भागापुरती मर्यादित असल्याने त्याठिकाणी मुख्यमंत्री कार्यालय हलवणे शक्य झाले होते. मात्र, आताचे संकट हे राज्यात सर्वदूर पसरले आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी बसून काम करणे जास्त गरजेचे आहे. जेणेकरून सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवता येईल. मी मुंबईला परतल्यावर येथील सर्व गोष्टींची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही शरद पवार यांनी सांगितले. 

दरम्यान, कोण काय म्हणतंय, कोण काय करतंय इकडे मी लक्ष देत नाही. मी पुन:पुन्हा सांगतो की, मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. माझ्यावर माझ्या जनतेचा विश्वास आहे तोपर्यंत काही चिंता नाही. यांचं ठिक आहे. हे बोलतील बोलत राहतील. कदाचित त्यांची पोटदुखी असेलही की, कुठेही न जाता, न फिरता एका संस्थेने देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली.  हीसुद्धा पोटदुखी असू शकेल, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांच्या टीकेला नाव न घेता उत्तर दिले.  

टॅग्स :मुंबईशरद पवारउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्या