सीएम फंड देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
By Admin | Updated: April 26, 2015 02:24 IST2015-04-26T02:24:25+5:302015-04-26T02:24:25+5:30
पत्र आणि चेकवर बोगस सही करून फसवणूक करणाऱ्या दिलीप हरिश्चंद्र राजेशिर्के (वय ४३) या मंत्रालयातील बडतर्फ कर्मचाऱ्याला पोलिसांनी शनिवारी अटक केली.

सीएम फंड देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
यदु जोशी - मुंबई
मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्याच्या नावाखाली खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीचे बोगस पत्र आणि चेकवर बोगस सही करून फसवणूक करणाऱ्या दिलीप हरिश्चंद्र राजेशिर्के (वय ४३) या मंत्रालयातील बडतर्फ कर्मचाऱ्याला पोलिसांनी शनिवारी अटक केली. या रॅकेटमध्ये मंत्रालयातील काही कर्मचारी असल्याचा संशय असून, त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.
राजेशिर्के केवळ मुख्यमंत्री साहाय्यता निधीच नव्हे, तर विविध शासकीय योजनांमध्ये मदत मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांना फसवित असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधी प्रकरणी आणखी तीन जणांची अशीच फसवणूक करण्यात आल्याचे समजते. त्यातील एक जण नागपूरचा आहे.
गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये अपघातग्रस्त झालेल्या आपल्या नातीवरील उपचाराचा खर्च म्हणून चर्नी रोड भागात राहणाऱ्या एका ७५ वर्षीय गुजराती वृद्धेने मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदतीसाठी अर्ज केला होता. भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी त्यासाठी शिफारसपत्रही दिले होते. या वृद्धेने अर्ज करताच राजेशिर्के याने तिच्याशी संपर्क साधला आणि मी मदत मिळवून देतो, असे सांगत अन्य काही पूरक कागदपत्रे मुख्यमंत्री कार्यालयातील कुणाल नावाच्या कर्मचाऱ्याला देण्यास सांगितले. स्वत:चे आडनाव त्याने राजेशिर्केऐवजी पवार असे सांगितले.
दुसरीकडे राजेशिर्केने मंगलप्रभात लोढा यांचे लेटरहेड मिळविले. वृद्धेने दिलेले पत्र जसेच्या तसे तयार केले. त्यावर लोढांच्या नावे बनावट सही केली. त्याच पत्रावर ‘सिक्स लॅक्स प्रोव्हायडेड बाय सीएम फंड’ असे लिहून खाली मुख्यमंत्र्यांच्या नावापुढे बोगस सही केली. आमदार निवास कँटिनमध्ये सहा लाख रुपयांचा बनावट चेक त्या वृद्धेला दाखवून तिच्याकडून ४० हजार रुपये उकळले. एक तासात तुमचे सहा लाख रुपये आणून देतो, असे सांगून राजेशिर्केने पोबारा केला. राजेशिर्के दाद देत नसल्याने त्या वृद्धेने मरिन लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार केली.
या प्रकरणाची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी राजेशिर्केच्या मुसक्या बांधण्याचे आदेश दिले. पोलिसांनी मग मोबाइल नंबरच्या आधारे राजेशिर्केला ट्रॅक केले आणि शनिवारी त्याला डोंबिवली येथे सापळा रचून अटक केली. त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेशिर्केसोबत आणखी एक जण असायचा, असे तक्रारकर्त्या वृद्धेने ‘लोकमत’ला सांगितले. राजेशिर्के यास अन्य घोटाळ्यांप्रकरणी २०११ मध्ये मंत्रालय सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.
आरोपी अटकेत
या प्रकरणाची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी राजेशिर्केच्या मुसक्या बांधण्याचे आदेश दिले. पोलिसांनी मग मोबाइल नंबरच्या आधारे राजेशिर्केला ट्रॅक केले आणि शनिवारी त्याला डोंबिवली येथे सापळा रचून अटक केली.