Join us

घराबाहेर गोळीबार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सलमान खानला फोन, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 13:54 IST

CM Eknath Shinde Call Salman Khan: घरासमोर गोळीबाराची घटना घडल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून सलमान खानची विचारपूस केली.

CM Eknath Shinde Call Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली असून पुढील तपास सुरू केला आहे. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानला फोन केल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. 

पहाटे पाचची घटना आहे. घराबाहेर रस्त्यावर फायरिंग झालेली आहे. तपासासाठी आम्ही टीम तयार केलेले आहेत. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अद्याप कुणावर संशय वगैरे काही नाही. तसेच, जबाबदारी कोणी स्वीकारलेली नाही, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. यानंतर आता या प्रकरणाची दखल खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आणि सलमान खानला फोन केल्याचे म्हटले जात आहे. 

मुख्यमंत्री शिंदे आणि सलमान खानची फोनवरून चर्चा

सलमान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर तणावाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानशी फोनवरून चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा करून सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्याचीही सूचना केली, असे वृत्त आहे. दुसरीकडे, या घटनेचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. पोलिसांच्या तपासातून खरी माहिती समोर येईल. त्यामुळे पोलिसांच्या तपास होईपर्यंत यावर काही सांगता येणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, मुंबईसह महाराष्ट्राची कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, गृहमंत्री राजकारणात व्यस्त आहेत. सत्तधारी पक्षातील कार्यकर्त्यांना पोलीस पोलीस संरक्षण देण्यात येत आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली. तत्पूर्वी, लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा घेतला होता. सलमान खानला सध्या वाय प्लस सुरक्षा पुरवली जाते. गेल्या वर्षी सलमान खानच्या ऑफिसला धमकीचा ईमेलही पाठवण्यात आला होता.  

टॅग्स :एकनाथ शिंदेसलमान खानदेवेंद्र फडणवीस