Join us

मुंबई-महाराष्ट्राची भाषा मराठीच, प्रत्येकाने...; भय्याजी जोशींच्या विधानावर CM फडणवीसांची स्पष्ट प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 14:49 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मराठीबाबत केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली

CM Devendra Fadnavis on RSS Leader Bhaiyyaji Joshi Marthi Comment:मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भय्याजी जोशी मराठी भाषेविरोधात वादग्रस्त विधान केलं. घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईतील प्रत्येकाला मराठी भाषा बोलता आलं पाहिजे असं नाही, असं विधान भैय्याजी जोशी यांनी केलं. त्यांच्या या खळबळजनक विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. दुसरीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनातही भैय्याजी जोशी यांच्या विधानाचे पडसाद उमटले. या विधानावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईची आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच असल्याचे म्हटलं.

"मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. जसे की मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गिरगावात हिंदी बोलणारे कमी सापडतील. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक दिसतील. मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. " असं वादग्रस्त वक्तव्य जोशी यांनी केलं आहे.

विद्याविहार येथील एका कार्यक्रमात बोलताना भय्याजी जोशी यांनी हे विधान केलं. भैय्याजी जोशी यांच्या विधानाचे राजकीय पडसाद उमटले आहेत. विधानसभेतही भैय्याजी जोशी यांच्या मराठीबाबतच्या विधानावरुन विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांच्या बाबती आपली भूमिका काय असा सवाल ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली.

मुंबईची भाषा मराठीच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

"भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य मी ऐकलेलं नाही. त्यामुळे ते ऐकून मी त्याच्यावर माहिती घेऊन मी बोलेन. याच्यावर सरकारची भूमिका पक्की आहे. मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठी आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे. प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. माझ्या वक्तव्याबाबत भय्याजी जोशी यांचेही काही दुमत असेल असं मला वाटत नाही. तरीही मी शासनाच्या वतीने सांगतो की, मुंबईची, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे. कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही. कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करु शकतो. त्यामुळे तो सन्मान आहेच. म्हणून शासनाची भूमिका पक्की आहे आणि शासनाची भूमिका मराठी आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

अशा प्रकारचे वक्तव्य म्हणजे राजद्रोह - संजय राऊत

"भय्याजी जोशी म्हणतात की, मुंबईत येऊन कोणी कोणतीही भाषा बोलू शकतो. कारण मुंबईला कोणतीच भाषा नाही. ते तामिळनाडूत जाऊन चेन्नईत असं बोलू शकतात का? बंगळुरु, लुधियानाला, पाटण्याला, लखनऊला जाऊन हे बोलू शकतात का? मराठी आमची राजभाषा आहे. राजभाषा असेल तर अशा प्रकारचे वक्तव्य म्हणजे राजद्रोह आहे," असे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमराठीमुंबईराष्ट्रीय स्वयंसेवक संघघाटकोपर