लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: धुळे येथे विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या खोलीमध्ये एक कोटी ८४ लाख रुपये सापडल्याचे प्रकरण घडल्यानंतर विधिमंडळाची नीतिमूल्य समिती स्थापन केली जावी आणि या समितीमार्फत धुळ्याच्या घटनेची चौकशी व्हावी असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले होते; मात्र अद्याप अशी समिती नियुक्त करण्यात आलेली नाही.
विधिमंडळ सदस्यांचे वर्तन कसे असावे,त्यांची जबाबदारी आणि कर्तव्ये यांचे पालन ते नीटपणे करतात की नाही यावर वॉच ठेवण्यासाठी नीतिमूल्य समिती असली पाहिजे असा आग्रह देवेंद्र फडणवीस यांनी ते विरोधी पक्षनेते असताना धरला होता. त्यावर याआधीच्या पिठासीन अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होऊन समिती स्थापन करण्याबाबत एकमत झाले होते; मात्र प्रत्यक्षात समिती स्थापन होऊ शकली नाही. ती लवकरच स्थापन केली जाईल असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लोकमतला सांगितले. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे म्हणाले की विधानमंडळ सचिवालयाकडून याबाबतचा प्रस्ताव अद्याप आपल्याकडे आलेला नाही.
अधिकारांचे वाटप नाही
विधानमंडळाचे जितेंद्र भोळे हे आधी एकटेच सचिव होते; मात्र दोन महिन्यांपूर्वी तीन ज्येष्ठ अधिकाऱ्यांनाही सचिव म्हणून पदोन्नती दिली. तिघांच्या अधिकारांचे वाटप अद्याप झालेले नाही. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तिघांचे अधिकार वाटप तातडीने करावे असे आदेश दिले.
विधिमंडळ सदस्यांची कर्तव्ये, त्यांच्या जबाबदाऱ्या, त्यांचे एकूणच वर्तन याची चौकट नीतिमूल्य समितीने निश्चित करावी. समितीने परिणामकारकपणे काम करावे. ही समिती असलीच पाहिजे. - अरुण गुजराथी, माजी अध्यक्ष विधानसभा.