चक्क मुख्यमंत्र्यांच्या पीएला गंडा !
By Admin | Updated: May 14, 2015 01:17 IST2015-05-14T01:17:58+5:302015-05-14T01:17:58+5:30
हॅलो.. मी बँकेतून बोलतोय.. खात्यात केवायसी अपडेट करण्यासाठी खाते क्रमांकासह एटीएम पिन सांगा.. अन्यथा खाते बंद होईल..

चक्क मुख्यमंत्र्यांच्या पीएला गंडा !
मुंबई : ‘हॅलो.. मी बँकेतून बोलतोय.. खात्यात केवायसी अपडेट करण्यासाठी खाते क्रमांकासह एटीएम पिन सांगा.. अन्यथा खाते बंद होईल..’ असा फोन आल्यास त्याला माहिती देऊ नका... असे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येते. मात्र अशा जाळ्यात खुद्द मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव
अडकल्याची घटना मंगळवारी
घडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव विवेक भिमलवार वरळीत राहतात. मंगळवारी सकाळी ९.३० च्या सुमारास त्यांचा फोन खणखणला. बँकेतून बोलत असल्याचे सांगून एका ठगाने केवायसी अपडेट करण्यासाठी त्यांना खात्याची माहिती मागितली. आपले बँक खाते बंद होईल, या भीतीने भिमलवार यांनी कसलीही शहानिशा न करता संबंधित माहिती त्या व्यक्तीला दिली. दुसऱ्या मिनिटालाच भिमलवार यांच्या मोबाइलवर त्यांच्या खात्यातून रक्कम काढल्याचा एसएमएस आला तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. वरळी येथील बँकेच्या एटीएममधून तब्बल ६४ हजार रुपये काढल्याचा तो एसएमएस होता. त्यांनी तत्काळ वरळी पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली.
या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अनोळखी ठगाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. संबंधित एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहे. या फुटेजनुसार संबंधित आरोपीचा शोध घेण्यात येईल, अशी माहिती वरळी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)