Join us  

शाळा बंदमुळे स्कुलबस चालकांच्या जीवनाचे चाक अडखळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 6:57 PM

शाळा व शैक्षणिक संस्था बंदचा परिणाम पगारावर, या महिन्यात अर्धाच पगार, पुढच्या पगाराची भ्रांत...

मुंबई : कोरोनामुळे अनेक हातावरच्या पोट असलेल्या कर्मचाऱ्यांना आज घरी बसून दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था कशी करायची हा प्रश्न पडला आहे. शिवाय लॉकडाऊन केव्हा उठणार याची वाट पहावी लागत आहे. अशीच काहीशी वेळ राज्यातील स्कुलबसचालकांवरही आली आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या शाळा आणि शैक्षणिक संस्था लॉकडाऊनच्या काळात बंद राहणार असल्याने साहजिकच स्कुलबसेसची सेवाही सध्या बंदच आहे. मात्र याचा मोठा फटका स्कुलबस असोसिएशनला बसला असून या महिन्यांत बस चालकांना केवळ आम्ही ५० टक्केच वेतन देऊ शकलो आहोत. पुढील महिन्यात ते ही देऊ शकणार नाही अशी हतबलता स्कुल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी व्यक्त केली. सरकारने आणि शाळांनी मदत केली असती तर ही वेळ आली नसती मात्र आता तरी त्यांनी याची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.सध्या राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा कालावधीही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊन कालावधीत बंद असणाऱ्या विविध मंडळाच्या शाळा आणि शैक्षणिक संस्थाही आणखी काही दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. शाळा बंद असल्यामुळे या कालावधीत पालकांकडून कोणत्याही प्रकारची शुल्कवसुली सध्या न करण्याचे निर्देशही शाळांना शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. शाळा देत असलेल्या बस सुविधा या कालावधीत पूर्णपणे बंद असल्यामुळे बस चालकांना कोणत्याही प्रकारचे काम सध्या नसून ते घरी आहेत. अशा परिस्थितीत शाळेकडूनही कोणत्याही प्रकारची मदत होत नसल्यामुळे स्कुलबस ओनर्सने यावेळी आपल्या बसचालकांना अर्धेच वेतन दिले असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली. स्कुल बस असोसिएशनला अनुदानाची व्यवस्था करावी किंवा मदत द्यावी, पुढील शैक्षणिक वर्षातील बस खरेदी, बसेसची देखभाल व्यवस्था यासाठी मदत करावी यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती. मात्र आम्हाला सरकारकडून काहीच मदत मिळाली नाही. शिवाय आम्ही पालकांकडूनही या दरम्यान कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारणी करत नाही. स्कुल बस ओनर्स असोसिएशनला या काळात मोठा तोटा सहन करावा लागत असल्याने आम्ही बस चालकांचे वेतनही पूर्ण देऊ शकत नसल्याची माहिती त्यांनी दिली.९००० बस चालक, ४००० क्लिनर्स / मदतनीस , ७००० महिला परिचर , १००० सुपर्व्हयझर्स यांना या काळात या सगळ्याचा फटका बसत आहे. साधरणतः मार्चमध्ये विविध सिबिएसई , आयसीएसई, इंटनॅशनल मंडळाच्या शाळा सुरु होऊन , त्याचे शुल्क जमा करून मे मध्ये सुट्टी लागल्यावर एप्रिल मे महिन्याचे या सगळ्यांचे पगार , इतर देयके , विविध प्रकरचे कर भरले जातात. ही स्कुलबस ऑनर्सची नेहमीची कार्यपद्धती असली तरी सध्या देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सगळी व्यवस्थाच कोलमडली असून या सगळ्यांचे ३ महिन्यांचे वेतन, देयके कसे देणार हा प्रश्न असोसिएशनपुढे उभा असल्याची प्रतिक्रिया गर्ग यांनी दिली. सरकारने हातावर पोट असलेल्या या सगळ्यांचा विचार करावा आणि मदत करावी अशी मागणी असोसिएशनमार्फ़त करण्यात आली आहे.

टॅग्स :शाळामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस