श्रीवर्धनमध्ये घड्याळाचा गजर

By Admin | Updated: October 20, 2014 03:26 IST2014-10-20T03:26:59+5:302014-10-20T03:26:59+5:30

१९३ - श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे रवि मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अवधूत तटकरे यांच्यात काँटे की टक्कर झाली.

Clock alarm in Shrivardhan | श्रीवर्धनमध्ये घड्याळाचा गजर

श्रीवर्धनमध्ये घड्याळाचा गजर

बोर्लीपंचतन : १९३ - श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे रवि मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अवधूत तटकरे यांच्यात काँटे की टक्कर झाली. यामध्ये अखेरच्या तीन फेऱ्यामध्ये अवधूत तटकरे यांनी आघाडी घेत अखेर ७७ मतांनी विजय मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा श्रीवर्धन मतदार संघाची ओळख असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गड राखल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आनंदाचे वातावरण असून निसटता पराभवाने शिवसेनेच्या गोटात निराशेचे वातावरण होते. विजयी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अवधूत तटकरे यांनी आपण श्रीवर्धनच्या विकासासाठी कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
१९३ - श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळी ८ वा मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळपासून श्रीवर्धनकडे प्रत्येक पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी दिसत होती. सहाय्यक पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांच्या अधिपत्याखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवसेनेचे उमेदवार रवि मुंडे व राष्ट्रवादीचे उमेदवार अवधूत तटकरे यांच्यामध्ये आघाडीचा पाठशिवणीचा खेळ सुरू असल्याचे चित्र मतदान आकडेवारीवरुन दिसून येत होते. प्रत्येक फेरीगणिक दोन्ही उमेदवारांचे मताधिक्य कमी - जास्त होत होते. अखेरच्या २२, २३, २४ फेऱ्यांमध्ये अवधूत तटकरे यांनी मिळविलेली आघाडी शिवसेनेचे उमेदवार रवि मुंडे यांना तोडता आली नाही व क्षणाक्षणाला रंगतदार झालेल्या लढतीमध्ये राष्ट्रवादीचे अवघूत तटकरे यांनी निसटता विजय मिळवित ७७ मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयामध्ये भाजपचे उमेदवार कृष्णा कोबनाक यांचा वाटा महत्वाचा ठरला आहे.
सेनेकडून उमेदवारीची मागणी पूर्ण न झाल्याने भाजपच्या तिकिटावर निवडणुकीमध्ये उतरलेले कृष्णा कोबनाक यांनी १,१,२९५ मते घेऊन सेनेच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याची चर्चा सर्वदूर होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा मतदारसंघ म्हणून श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. (वार्ताहर)

Web Title: Clock alarm in Shrivardhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.