टार्गेट पूर्तीसाठी क्लिनप मार्शलची दादागीरी
By Admin | Updated: May 16, 2015 23:01 IST2015-05-16T23:01:43+5:302015-05-16T23:01:43+5:30
शहर स्वच्छतेच्या नावावर महानगरपालिकेने दिलेल्या कंत्राटामध्ये नेमलेले क्लिनप मार्शल सध्या वसई विरार परिसरातील नागरिकांची डोकेदुखी वाढवत आहे.

टार्गेट पूर्तीसाठी क्लिनप मार्शलची दादागीरी
वसई : शहर स्वच्छतेच्या नावावर महानगरपालिकेने दिलेल्या कंत्राटामध्ये नेमलेले क्लिनप मार्शल सध्या वसई विरार परिसरातील नागरिकांची डोकेदुखी वाढवत आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी ते नागरिकांना वेठीस धरत असल्याने असंतोष निर्माण झाला आहे. यात मुंबईतील गुंड प्रवृत्तीचे तरुण असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे.
दोन महिन्यापूर्वी काही मार्शलने रेल्वेच्या आवारात जाऊन नागरिकांना दमदाटी केली. येथील रिक्षाचालकांनी त्यांना चोप देण्याची तयारी केली परंतु त्याची माहिती त्यांना लागल्यामुळे ते बाहेर पडले. शुक्रवारी वसई रोड रेल्वेस्थानकाच्या भागातही नागरिकांत असंतोष बघायला मिळाला.
शहर स्वच्छतेचे कारण समोर करून जबरदस्तीने खंडणी वसूल करणाऱ्या क्लिनप मार्शलला रोखण्यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर यांनी निर्णय घेणे आवश्यक आहे. नागरिकांवर हात उचलणारे हे क्लिनप मार्शल मुंबईतील गुंड प्रवृत्तीचे तरूण आहेत. ज्या ठेकेदाराने त्यांना कामावर घेतले आहे त्यांचीही चौकशी व्हावी. याची दखल नगरसेवकांनीही घ्यायला हवी.
- रमाकांत सावंत,
नालासोपारा पूर्व
महानगरपालिकेने थुंकणाऱ्या नागरिकांना पकडण्याऐवजी सर्वप्रथम हद्दीतील कचऱ्याची विल्हेवाट लावावी. डंम्पिंग ग्राऊंड उभारू न शकणारी महानगरपालिका काहींचे खिशे भरण्यासाठी असे कंत्राट देत आहे. ही सर्वसामान्य करदात्यांच्या पैशाची उधळण आहे.
- संगीता घाग, विक्री प्रतिनिधी वसई रोड
या क्लिनप मार्शलला रोज १० केसेस करण्याचे टार्गेट असल्यामुळे ते नागरिकांशी दंडेली करतात. महानगरपालिकेचे कवच असल्यामुळे आम्ही काहीही करू शकतो, अशा भूमिकेत ते आहेत. ते भविष्यात वसई विरार भागात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडवतील.
- सुनिल शहा, विरार पश्चिम