हवामानातील बदलाचा ‘ताप’
By Admin | Updated: October 28, 2015 00:18 IST2015-10-28T00:18:20+5:302015-10-28T00:18:20+5:30
आॅक्टोबर हीटच्या चटक्यांनी मुंबईकर हैराण झाले असतानाच गेल्या तीन दिवसांपासून मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार नोंदवले जात आहेत.

हवामानातील बदलाचा ‘ताप’
मुंबई : आॅक्टोबर हीटच्या चटक्यांनी मुंबईकर हैराण झाले असतानाच गेल्या तीन दिवसांपासून मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार नोंदवले जात आहेत. ३६ अंशांवर पोहोचलेले कमाल तापमान ३४ अंशांवर स्थिरावले आहे. किमान तापमान २६ हून २४ अंशांवर घसरले आहे. परिणामी आॅक्टोबर संपत असतानाच कमाल आणि किमान तापमानात होत असलेले बदल मुंबईकरांना ‘ताप’दायक ठरत आहेत. हिवाळा सुरू होईपर्यंत मुंबईकरांना अशाच बदलत्या तापमानाला सामोरे जावे लागणार आहे.
आॅक्टोबर संपताक्षणी पश्चिमेकडील थंड वारे पूर्वेकडे वाहू लागतात आणि उत्तर भारताला थंडीचे वेध लागतात. सोमवारीच जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी झाली. या बर्फवृष्टीसह पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे थंड वारे जोर पकडतात. हेच वारे कालांतराने दक्षिण भारताकडे वाहू लागल्यानंतर महाराष्ट्रासह लगतच्या राज्यांत थंडीचा कडाका पडतो. सध्या हीच स्थिती आहे. पारा किंचित घसरला आहे. मुंबईसह परिसरात ढगाळ वातावरण असल्याने येथील उष्णतेचे प्रमाण कमी आहे. मात्र या बदलामुळे घाम येण्याचे प्रमाण वाढले आहे. पुढील ४८ तास मुंबई आणि परिसरातील आकाश मुख्यत: ढगाळ राहील. शिवाय हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २५ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. (प्रतिनिधी)
हिवाळा सुरू होण्यास अद्याप अवकाश
जेव्हा कमाल तापमानात घसरण होते, तेव्हा थंडीचा कडाका वाढतो, असे मुंबई प्रादेशिक हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. सध्या कमाल तापमान ३४ अंशांच्या आसपास असून, ते २६ अंशांवर येईल तेव्हा मुंबईकरांना थंडीची चाहूल लागेल आणि यासाठी किमान दिवाळी उजाडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शहरात पावसाच्या सरी
मुंबईत मंगळवारी सकाळी शहरात तुरळक पावसाची नोंद झाली. त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शहरात मळभ
दाटून आल्याने ऊन-सावलीचा खेळ सुरू होता.
श्वसनविकारांचा धोका!
१हवामान बदलाच्या काळात संसर्गजन्य आजार बळावतात. डेंग्यू आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याचा धोका असल्याने मुंबईकरांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
२थंड आणि कोरड्या अशा संमिश्र हवामानामुळे श्वसनविकार बळावतात. खोकला, सर्दीचा त्रास वाढतो. फुप्फुसांवर याचा अधिक परिणाम झाल्यास न्यूमोनिया होण्याचा धोका वाढतो. गॅस्ट्रो होण्याचाही धोका असतो, असे फॅमिली फिजिशियन डॉ. शैलजा सिंग यांनी सांगितले.
३ज्या व्यक्तींना सर्दी, खोकला झाला असेल त्यांनी आपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्यावी.
४थंडीत घशाला संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक असते. अस्थमा असणाऱ्यांना या कालावधीत अधिक त्रास होतो. त्यामुळे प्रदूषण असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे. मास्क वापरावेत, असे श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. स्वप्निल कुलकर्णी यांनी सांगितले.