गणेश मंडळांना स्वच्छतेच्या सूचना

By Admin | Updated: August 24, 2015 02:11 IST2015-08-24T02:11:54+5:302015-08-24T02:11:54+5:30

मुंबई शहर आणि उपनगरांतील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सवात स्वच्छता राखण्याच्या सूचना मुंबई महापालिकेने केल्या आहेत.

Cleanliness instructions for Ganesh Mandals | गणेश मंडळांना स्वच्छतेच्या सूचना

गणेश मंडळांना स्वच्छतेच्या सूचना

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सवात स्वच्छता राखण्याच्या सूचना मुंबई महापालिकेने केल्या आहेत. शिवाय आरोग्याबाबतही हेळसांड करू नये, असे आवाहनही पालिकेने केले असून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर मंडळांनी भर द्यावा, असे म्हटले आहे.
मुंबई महापालिकेचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मंडपाबाबत धोरण निश्चित झाल्यानंतर आता आज (सोमवार) पासून मंडळाचे पालिकेच्या संबंधित विभागाकडे मंडपाच्या परवानगीसाठीचे अर्ज सादर होणार आहेत. महापालिका, पोलीस आणि वाहतूक पोलीस अशा तीन स्तरांवर मंडळांना परवानग्या दिल्या जाणार आहेत. परवानग्यांची प्रक्रिया लवकर होऊन मंडळांना दिलासा मिळावा, यासाठी महापौरांनी प्रशासनाला वेगाने कामे करण्याचे निर्देशही दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने मंडळांना काही सूचना केल्या आहेत. त्यात मंडळाने आपल्या विभागात उंदीर, डास इत्यादींचा उपद्रव होणार नाही याची काळजी घ्यावी; जेणेकरून लेप्टोसह उर्वरित साथीच्या आजारांचा फैलाव होणार नाही. मोकळ्या जागांवरील माती, कचरा काढून घेण्याची काळजी घ्यावी, जेणेकरून स्वच्छता राखली जाईल व आरोग्यास धोका निर्माण होणार नाही. प्रत्येक मंडळाने आवश्यकतेनुसार कचरा साठविण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी. वाहतूक, पादचारी आणि उर्वरितांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी. मंडपाच्या परिसरात महापालिकेची लोकोपयोगी भित्तीपत्रके, कापडी फलक, समाजपयोगी माहितीपत्रके प्रदर्शित करावीत. मंडपाच्या परिसरात आग विझविण्यासाठी रेतीच्या बादल्या, पाण्याची व्यवस्था करावी. मंडपांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात फेरीवाले खाद्यपदार्थांची विक्री करतात, त्यांना प्रतिबंध करावा. भाविकांच्या सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी आणि पोलिसांना सहकार्य करावे, या सूचनांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Cleanliness instructions for Ganesh Mandals