पर्यायी कामगार करणार सफाई

By Admin | Updated: October 14, 2014 23:11 IST2014-10-14T23:11:03+5:302014-10-14T23:11:03+5:30

विधानसभा निवडणूक कार्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेचा ८० ते ९० टक्के कर्मचारीवर्ग व्यस्त असतानाही आता अंतिम टप्प्यातील कार्यात पालिकेतील सफाई कामगारांनाही नेमण्यात आले आहे

Cleaner to do alternative workers | पर्यायी कामगार करणार सफाई

पर्यायी कामगार करणार सफाई

कल्याण : विधानसभा निवडणूक कार्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेचा ८० ते ९० टक्के कर्मचारीवर्ग व्यस्त असतानाही आता अंतिम टप्प्यातील कार्यात पालिकेतील सफाई कामगारांनाही नेमण्यात आले आहे. कल्याणातील अ, ब आणि क प्रभागांतील १०० टक्के कामगार निवडणूक कार्यात गुंतल्याने आता इतर प्रभागांमधून या ठिकाणी वर्ग करण्यात येणाऱ्या पर्यायी कामगारांना येथील सफाई करावी लागणार आहे.
केडीएमसी परिक्षेत्रातून प्रतिदिन सरासरी ५५० टन कचरा गोळा केला जातो. महापालिकेचे ७ प्रभाग आहेत़ यातील ह आणि ड प्रभागांतील कचरा उचलण्याचे काम खाजगी ठेकेदाराला देण्यात आले असले तरी उद्भवलेल्या वादात सध्या ते पालिकेच्याच कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागात २२८४ कामगार आहेत. यातील १९५५ कामगार दैनंदिन सफाईकामी कार्यरत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी केडीएमसीचा बहुतांश कर्मचारीवर्ग घेतला आहे.
१४ आॅक्टोबरपासून पालिकेतील सफाई कामगारही निवडणूक कामात व्यस्त होणार आहे. १४ आणि १५ आॅक्टोबरला निवडणुकीचे काम आणि त्यानंतर १६ आॅक्टोबरला निवडणुकीनंतरची सुटी, त्यामुळे सलग तीन दिवस या कामगारांकडून शहरातील सफाईचे काम होणार नाही. पालिकेतील १९५५ कामगारांपैकी ८२५ कामगार निवडणुकीच्या कामासाठी घेण्यात आले आहेत. उर्वरित ११३० कामगारांमध्ये ६५० महिला कामगार असून त्यांच्याकडून प्रामुख्याने रस्तासफाईची कामे केली जातात. त्यामुळे कचरा उचलण्याच्या तसेच गटार साफसफाईच्या कामाला पुरुष कामगारांच्या कमतरतेमुळे चांगलाच खोडा बसण्याची शक्यता आहे.
अ, ब आणि क प्रभागांतील १०० टक्के कर्मचारीवर्ग निवडणूक कामासाठी घेण्यात आल्याने या प्रभागात डोंबिवलीतील ग आणि ह प्रभागांतील ज्या कामगारांना इलेक्शन ड्युटी नाही, अशा १०३ कामगारांना वर्ग केले आहे.
क प्रभागात रेल्वे स्थानक आणि बाजारपेठ परिसर येतो, त्यामुळे या ठिकाणी प्रतिदिन मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो. ही वस्तुस्थिती असताना येथील सगळेच कामगार निवडणूक कामात उद्यापासून व्यस्त होणार आहेत. दरम्यान, इतर प्रभागांमधून या ठिकाणी कामगार वर्ग करणार असल्याने सफाईच्या कामावर परिणाम होणार नाही, असा दावा घनकचरा विभागाने केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Cleaner to do alternative workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.