सफाईच्या कामांचा घोळ सुरूच
By Admin | Updated: December 17, 2014 02:07 IST2014-12-17T02:07:01+5:302014-12-17T02:07:01+5:30
महापालिका प्रशासनास साफसफाईच्या कामांचा प्रश्न सोडविण्यात अपयश आले आहे.

सफाईच्या कामांचा घोळ सुरूच
नामदेव मोरे, नवी मुंबई
महापालिका प्रशासनास साफसफाईच्या कामांचा प्रश्न सोडविण्यात अपयश आले आहे. २००९ मध्ये मूळ ठेकेदारांच्या कामाची मुदत संपली असून त्याच ठेकेदारांना मुदतवाढ देऊन काम करून घेतले जात आहे. नवीन ९१ ठेकेदार नियुक्त करण्याचा प्रस्तावही मंजूर झाला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी करण्यास दिरंगाई होऊ लागली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेला संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये दोन वेळा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार प्राप्त महापालिकेला साफसफाईचे ठेकेदार ठरविण्यामध्येही चाचपडावे लागत आहे. सद्यस्थितीमध्ये काम करणाऱ्या ठेकेदारांची नियुक्ती २००४ मध्ये करण्यात आली होती. त्यांच्या कामाची मुदत २००९ मध्येच संपली आहे. मूळ निविदेमधील तरतुदीप्रमाणे त्यांना दोन वर्षे मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदतही २०११ मध्ये संपली आहे. परंतु त्यानंतरही मागील ३ वर्षात नवीन ठेकेदारांची नियुक्ती करता आलेली नाही.
प्रथम महापालिकेने फक्त दोनच ठेकेदार नियुक्त करण्याचा निर्णय घेवून तसा ठराव मंजूर केला होता. परंतु स्थानिक ठेकेदारांवर अन्याय झाल्याची भावना प्रकल्पग्रस्तांमध्ये निर्माण झाली होती. यामुळे पहिला प्रस्ताव रद्द करून पुन्हा विभागनिहाय ९१ ठेकेदार नियुक्त करण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी घेण्यात आली. यासाठी निविदा काढण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी ८१ ठेकेदारांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. जूनमध्ये उर्वरित १० ठेक्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
सफाईच्या ठेकेदार नियुक्तीचा प्रस्ताव मंजूर होवूनही नवीन ठेकेदारांना अद्याप कार्यादेश देण्यात आलेला नाही. ८१ ठेक्यांना मंजुरी मिळून ९ महिने पूर्ण झाले आहेत. उर्वरित दहा ठेक्यांना मंजुरी मिळूनही जवळपास सहा महिने झाले आहेत. पालिकेला साधे सफाई ठेकेदार नियुक्त करता येत नसने टीका होत आहे. सदर कामांना उशीर झाल्यामुळे उलट - सुलट चर्चा सुरू झाली आहे. ठेकेदारांकडून पैसे वसूल करण्यासाठी कामे रखडवल्याची चर्चाही होती. जवळपास २४१ कामगारांना सामावून घेण्याचा वाद सुरू असल्याचीही चर्चा आहे.