जागा नाही म्हणून प्रयोगशाळेत वर्ग

By Admin | Updated: May 11, 2015 01:34 IST2015-05-11T01:34:38+5:302015-05-11T01:34:38+5:30

मुंब्रादेवी रोडजवळील तळ अधिक तीन मजली इमारतीमध्ये ठामपाच्या १२४, ११३, ७७ आणि ११६ या क्रमांकांच्या उर्दू माध्यमाच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा भरतात.

Classroom in the lab as not the place | जागा नाही म्हणून प्रयोगशाळेत वर्ग

जागा नाही म्हणून प्रयोगशाळेत वर्ग

कुमार बडदे, मुंब्रा
येथील रेल्वे स्थानकासमोरील मुंब्रादेवी रोडजवळील तळ अधिक तीन मजली इमारतीमध्ये ठामपाच्या १२४, ११३, ७७ आणि ११६ या क्रमांकांच्या उर्दू माध्यमाच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा भरतात. या शाळांत प्रामुख्याने अचानकनगर, संजयनगर, जीवनबाग बाजारपेठ या भागांतील विद्यार्थी येतात. २०१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून वरील शाळेच्या तुकड्यांचे विभाजन करण्यात आले आहे. यामुळे वर्ग कमी पडत असल्याने चौथ्या मजल्यावरील प्रयोगशाळेमध्ये एका तुकडीच्या विद्यार्थ्यांना बसावे लागते.
या शाळेतील दोन्ही सत्रांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या १५५० आहे. परंतु, विद्यार्थ्यांच्या तुलनेत बेंचेस कमी असल्याने काही विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहे. या शाळेत शिक्षकांचीदेखील संख्या कमी आहे. याचप्रमाणे शाळा क्रमांक १२४ साठी मुख्याध्यापक असून इतर तीन शाळा त्याशिवाय सुरू आहेत. विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी आवश्यक असणाऱ्या बहुतांश सर्वच प्राथमिक साधनांची या शाळेत उपलब्धता आहे.
परंतु, शाळेच्या विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान मात्र नाही. यामुळे विद्यार्थ्यांचा पीटीचा तास चक्क टेरेसवर घ्यावा लागत असल्याची खंत शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केली. टेरेसवर असलेल्या पिलरमुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे खेळ शिकविताना मर्यादा येतात. तसेच संपूर्ण शाळेचा एकत्र कार्यक्रम घेण्यातही अडचणी येतात. तसेच टेरेस उघडे असल्यामुळे त्याचा वापर पावसाळ्यात पीटीच्या तासांसाठीही करता येत नाही.
-------
यासाठी इतर काही शाळांप्रमाणे या शाळेच्या टेरेसवरदेखील पत्रे टाकण्याची नितांत गरज असल्याची माहिती शिक्षकांनी दिली. शाळेच्या तुकड्यांचे विभाजन करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना सुटसुटीतपणा जाणवत आहे. यामुळे विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकदेखील समाधान व्यक्त करीत असून या विस्तारामुळे शाळेची पटसंख्या वाढण्याची शक्यता असल्याचे एका शिक्षकाने सांगितले.

Web Title: Classroom in the lab as not the place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.