रसिकांसाठी शास्त्रीय नृत्याची पर्वणी
By Admin | Updated: February 6, 2015 01:05 IST2015-02-06T01:05:36+5:302015-02-06T01:05:36+5:30
भरतनाट्यम, कथ्थक, मोहिनीअट्टम आणि कुचिपुडी हे शास्त्रीय नृत्यप्रकार एकाच मंचावर पाहण्याची संधी नृत्य रसिकांना मिळाली आहे.

रसिकांसाठी शास्त्रीय नृत्याची पर्वणी
मुंबई : भरतनाट्यम, कथ्थक, मोहिनीअट्टम आणि कुचिपुडी हे शास्त्रीय नृत्यप्रकार एकाच मंचावर पाहण्याची संधी नृत्य रसिकांना मिळाली आहे. निमित्त आहे ते ‘रंग हर्षा’ या शास्त्रीय नृत्य महोत्सवाचे. भारतीय संस्कृती समन्वय, नविनेथम व सोमय्या विद्याविहार यांच्या संयुक्त विद्यमाने हा नृत्य महोत्सव विनामूल्य विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयात रंगला आहे.
महोत्सवाची सुरुवात ५ फेब्रुवारीला झाली असून पहिल्याच दिवशी भरतनाट्यम व कथ्थक नृत्याचा आस्वाद रसिकांनी घेतला. विराजा मंधरे, श्यामजीत किरण, शुभी जोहारी व अमित खिंची यांच्या बहारदार नृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
६ फेब्रुवारी रोजी नालंदा विद्यापीठातून पदवीधर झालेल्या नर्तिका डॉ. मैथिली अनुप यांच्या ‘मोहिनीअट्टम’ नृत्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येईल. मैथिली या बंगळुरू येथील दास्यम नृत्यशाळेत आपल्या कलेचे ज्ञान येथील विद्यार्थ्यांना देतात. नृत्यविशारद मैथिली यांचा ‘मोहिनीअट्टम’ हा नृत्याविष्कार रसिकांना पाहता येईल.
नृत्य महोत्सवाची सांगता ७ फेब्रुवारी रोजी कुचिपुडी व ओडिसी नृत्याने होईल. नृत्यांगना श्यामा शशिधरन कुचिपुडी नृत्य सादर करतील. तर लहान वयातच ओडिसी नृत्यात प्रभुत्व गाजवणाऱ्या अर्पिता वेंकटेश हिच्यासोबत दूरदर्शनवरील प्रसिद्ध नर्तिका अर्घा चॅटर्जी ओडिसी नृत्य सादर करतील. असा हा तीन दिवसीय नृत्य महोत्सव रंगणार आहे. (प्रतिनिधी)