Join us  

दहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता होणार मोबाइल अ‍ॅपद्वारे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 2:10 AM

दहावी इयत्तेतील विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता मोबाइल अ‍ॅपद्वारे घेण्यात येणार आहे. तसा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.

मुंबई : दहावी इयत्तेतील विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता मोबाइल अ‍ॅपद्वारे घेण्यात येणार आहे. तसा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.दरवर्षी राज्यमंडळ, विद्या प्राधिकरण व श्यामची आई फाउडेशनच्या संयुक्त विद्यमाने ही कलमापन चाचणी घेण्यात येते. मात्र, यंदापासून ती मोबाइल अ‍ॅपद्वारे श्यामची आई फाउंडेशनच्या मदतीने घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षणाचे आयोजन, तसेच प्रशिक्षणार्थींच्या नियुक्त्या जिल्ह्यातील विभागीय मंडळांनी त्यांच्या स्तरावर करण्याच्या सूचना शिक्षण मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.या प्रशिक्षणासाठी तालुकानिहाय दोन प्रशिक्षणार्थींची ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून नेमणूक करण्यात आली असून, त्यांना श्यामची आई फाउंडेशनमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे मास्टर ट्रेनर तालुक्यातील शाळांना मोबाइल अ‍ॅपद्वारे प्रशिक्षण देतील. यासाठी तंत्रस्नेही शिक्षक, व्यवसाय शिक्षण विषयाच्या शिक्षकांची निवड करण्याची सूचनाही मंडळाने केली आहे.त्याचप्रमाणे, ही चाचणी मोबाइल अ‍ॅपद्वारे घेण्यात येणार असल्याने, शाळेचे मुख्याध्यापक आणि संबंधित कर्मचाऱ्यांचा संपर्क क्रमांक, यू डायस क्रमांक तयार ठेवण्याचे निर्देश करण्यात आले आहेत.करिअर निवडीसाठी होतो उपयोगमहाराष्ट्रातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमधून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कल चाचणी हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची अभिरूची आणि अभिक्षमता चाचणी घेण्यात येते. याचा दहावीनंतरच्या करिअर निवडीसाठी उपयोग होतो. या वर्षी ही चाचणी मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून घेण्यात येणार असून, यासाठीचे प्रशिक्षण विभागस्तरावर २६ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :विद्यार्थी